जलजीवनला पाईप चोरी मुळे घरघर

0
1736

जलजीवन मिशन योजनेचे सुमारे ४३ लाख ०५ हजार ५२३ रुपये किमतीचे पाईप चोरीला

युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर


तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेसाठी लागणाऱ्या पाईपांना पाय फुटले आहे. वारंवार हे पाईप चोरीला जात असल्याने जणू काही या योजनेला घरघर लागल्याचे दिसत आहे. तालुक्यातील तिगाव येथे एका कंपाऊंड मध्ये ठेवलेले जलजीवन मिशन योजनेचे सुमारे ४३ लाख ०५ हजार ५२३ रुपये किमतीचे पाइप चोरीला गेले आहे. ही घटना सोमवारी (दि.०७) उघडकीस आली.अभियंता सचिन शरद रेवगडे (रा. हिवरगाव आंबरे, ता. अकोले) यांनी याबाबत फिर्याद दिली, त्यानुसार तिगाव परिसरात जलजीवन मिशन योजनेचे काम सुरू आहे. येथील एका पाण्याच्या टाकीचे कम्पाउंडमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एकूण ५२८ पाइप ठेवलेले होते. मात्र २८ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान हे पाइप चोरीला गेल्याचे उघडकीस आले.
याबाबत माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्यातील परिविक्षाधिन पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी यासंदर्भाने माहिती घेत तपासाच्या सूचना दिल्या असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शालोमन सातपुते अधिक तपास करीत आहे. दरम्यान जलजीवन मिशन योजनेचे पाइप चोरीला जाण्याची या महिन्यातील दुसरी घटना आहे.

या अगोदर देखील तालुक्यातील वेल्हाळे गावातून जलजीवन मिशन योजनेचे ३० लाख ३ हजार ७८४ रुपये किमतीचे पाइप चोरीला गेल्याची घटना घडली होती. दरम्यान एका पाईपाचे वजन साधारण एकशे पंधरा किलो इतके आहे. तसेच त्याची लांबी देखील खुप जास्त असते. अशा परिस्थितीत हे पाईप चोरून नेणे अत्यंत कठीण व जिकरीचे काम आहे. तसेच हे पाईप उचलून नेणे देखील अशक्य आहे. क्रेन, जेसीबी सारख्या मशीन शिवाय हे पाईप चोरणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत हे पाईप चारणारे साधे सुधे चोर असण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे या पाठीमागे फार मोठी टोळी असून पोलीस प्रशासनाने सखोल तपास करण्याची गरज आहे.
केंद्र शासनाने ग्रामीण भागासाठी जलजीवन मिशन ही महत्वकांक्षी योजना सुरू केली. परंतु तालुक्यात तर थेट पाईपच चोरी होऊ लागल्याने या योजनेला घरघर लागल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here