शासकीय अधिकारीही दबावाला बळी – कतारी
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर
दिव्यांग बांधवांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. त्याचसाठी मागील महिन्यात संगमनेर क्रीडा संकुल येथे तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाने कॅम्प आयोजित केला होता. त्याचीच पुढील प्रक्रिया म्हणून जिल्हा रुग्णालयामार्फत तालुक्यातील सुमारे ३५० दिव्यांग बांधवांची यादी तयार करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे निरोप काल संगमनेर ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आले व आज ग्रामीण रुग्णालयामार्फत दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता सुरवात केली. मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट समजताच त्यांनी सदरील प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम राजकीय दबाव वापरून थांबवत तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम तूर्तास रद्द झाला असून पुढील तारीख कळवणार असल्याचे भाजपा कार्यकर्त्यांनी जाहीर केले, जे पूर्णतः चुकीचे असून केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी दिव्यांग बांधवांना अश्या प्रकारे वेठीस धरणे, त्यांचा अवमान करने म्हणजे भाजपाची नीतिमत्ता देखील भ्रष्ट झाली असल्याचे गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे) शहरप्रमुख अमर कतारी यांनी केला आहे.
याबाबत बोलताना कतारी सदरील घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील दिव्यांग बांधव दुखावले गेले असून जबाबदार शासकीय अधिकारी यांनी कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे दिव्यांगांचा अवमान झाला असल्याने त्यांच्यावर उच्च स्तरावरून कारवाई करावी अशी लेखी तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक, आरोग्य मंत्री तसेच समाजकल्याण मंत्री यांना करणार असल्याचे दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाप्रमुख जालिंदर लहामगे यांनी स्पष्ट केले. तसेच संगमनेर ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी यासाठी शिवसेना मार्फत प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याचे तालूकाप्रमुख भाऊसाहेब हासे, शहर प्रमुखअमर कतारी यांनी सांगितले.