वाढती वाहन संख्या व वाहन चालकांचा बेशिस्तपणामुळे नागरीक त्रस्त
शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी नगर परिषदेची असते तर वाहतूक नियंत्रण करण्याची जबाबदारी ही पोलीसांची असते. मात्र ही दोन्ही प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत नसल्याने वाहतूक प्रश्न हा संगमनेरकरांसाठी डोकेदुखी ठरला आहे. मोठा गाजावाजा करत रस्त्यावरील अतिक्रमण काढले जाते, मात्र त्यानंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते, आणि त्याठिकाणी पुन्हा अतिक्रमण होते. तीच अवस्था पोलीस यंत्रणेची आहे.
येथे वाहने उभी करु नये अशा पाट्या किंवा आदेश अनेक ठिकाणी पहायला मिळतात परंतु आपली वाहने सुरक्षितपणे कुठे उभी करावी किंवा पार्क करून जावे अशी सोय कुठेही आणि कुणीही केलेली नाही. त्यामुळे वाहनचालक आपली वाहने मनमानी पद्धतीने उभी करून वाहतूक समस्या निर्माण करतात. रस्ते अरुंद होत असले तरी पार्किंग झोन नसल्याने रोज वाहतूक किरकिरीला नागरीकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पोलीस आणि नगर परिषद यांनी समन्वयाने असे पार्किंग झोन उभारल्यास हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
युवावार्ता (संजय अहिरे)
संगमनेर – वाढते नागरीकीकरण व वाढत असलेला शहराचा विस्तार यामुळे शहरातील नागरीकांना मिळणार्या मुलभूत सुविधांवर मोठा ताण पडत आहे. शहरातील रस्त्यांची रुंदी वाढविण्याचे काम सातत्याने सुरू असले तरी वाढती वाहन संख्या व वाहन चालकांचा बेशिस्तपणा यामुळे नागरीकांना रोज वाहतूकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शहरात लवकरात लवकर महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंग झोनची व्यवस्था करावी व नागरीकांना या समस्येपासून दिलासा द्यावा अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहे.
संगमनेर तालुका येथील सहकारामुळे प्रगत झाला. त्यातच पुणे – नाशिक या मेट्रो सिटीच्या मध्यभागी संगमनेर शहर वसल्याने दळणवळणासाठी रोज हजारो वहाने पुणे नाशिक महामार्गावरुन व असंख्य वाहने शहरातून प्रवास करतात. शहरातील रस्त्यांची रुंदी कमी असताना व जड वाहतूकीस परवानगी नसताना देखील अनेक जड वाहणे शहरातून ये-जा करतात. त्यातच शहरातील छोटी वाहने, रिक्षा, दुचाकी आडव्या तिडव्या पळत असल्यामुळे वाहतूक जाम, अपघात, कर्णकर्कश आवाज असा सावळा गोंधळ नेहमी पहायला मिळतो.
शहरातील बसस्थानक परिसर, नवीन नगर रोड, नवीन अकोले रोड, नाशिक रोड, नगर रोड, तीन बत्ती चौक या ठिकाणी तर नेहमीच वाहतूक ठप्प किंवा इतर समस्या उद्भवत असतात. पोलीस आणि नगर परिषदेकडून याठिकाणी कोणत्याही प्रकारची ठोस व्यवस्था केली जात नसल्याने पादचारी, ज्येष्ठ नागरिक यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर दुतर्फा व्यवसायीकांचे झालेले अतिक्रमण, उभी राहणारी वाहने आणि त्यातून वाट काढत जाणारी इतर वाहने आणि त्यातून निर्माण होणारी समस्या कायमस्वरूपी संपवायची असेल तर वाहतूकिला शिस्त लावण्याबरोबरच काही ठिकाणी पार्किंग झोन निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
वाहन चालक आपली वाहने कुठेही आणि कशीही उभी करतात. काही जण तर वाहने उभी करून बाहेर जातात किंवा गप्पा मारत बसतात. त्यामुळे मागे वाहनांच्या रांगा लागतात पण कुणाचे याकडे लक्ष नसते. पोलीस देखील अनेक वेळा जागेवर नसतात किंवा असले तर दुर्लक्ष करतात. किंवा तोंड पाहून कारवाई करतात. वरिष्ठांचे देखील याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ही समस्या वाढत आहे.