“चेहरा होईल गोरा, फक्त १५ दिवसांत….” अशा जाहिराती बघून आजवर गोरा झालेला चेहरा मी तरी पाहिला नाही. सेन्सेक्स ६३,००० वरून ५०,००० च्या आसपास आल्यावर पांढरे पडलेले चेहरे मात्र खूप बघायला मिळाले. भारतात गुंतवणूक करणे म्हणजे झटपट पैसे कमविणे, हे सूत्र सामान्य लोकांच्या मनावर बिंबविले गेले आहे. अशी गुंतवणूक म्हणजे फसवणूक असते किंवा गुंतून पडण्याची मरवणूक तरी असते. आणि मग शेअर मार्केट म्हणजे सट्टा, ५२ पत्त्यांचा खेळ वगैरे वगैरे संवाद ऐकायला मिळतात.
म्युच्युअल फंडात गुंतवणूकदाराला खरंच लाभ होतो का?
वैभवने विचारलेला प्रश्न. या प्रश्नाला परस्पर पूरक दोन उत्तरं आहेत. होतो पण आणि नाही पण. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एका अमेरिकन म्युच्युअल फंड योजनेचा इतिहास पाहू. कारण आपल्याला पाश्चात्य गोष्टींचं आकर्षण कायमच राहिलं आहे. लार्ज कॅप गटातील त्या योजनेचं नाव आहे सिजीएम फोकस फंड. २००० ते २००९च्या दशकात या योजनेने द.सा.द.शे. १८% दराने चक्रवाढ पद्धतीने परतावा दिला. या गटातील इतर योजनांदेखील सरासरी द.सा.द.शे. १५% दराने परतावा दिला होता. मग बाजार विश्लेषकांनी सामान्य गुंतवणूकदारांना नक्की किती परतावा किंवा लाभ त्या दशकात झाला? याचा अभ्यास केला आणि त्यातून समोर आलेले सत्य धक्कादायक होते.
योजनेचे गुंतवणूक भांडार अर्थशास्त्रातील ७२ च्या सुत्रानुसार दर ४ वर्षांनी दुप्पट झाले होते. म्हणजेच २००० ते २००९ या दशकात किमान ९ ते १० पट गुंतवणूक मूल्य वाढले होते. परंतु त्या योजनेच्या गुंतवणूकदारांना उणे ११% परतावा मिळाला होता. असे का झाले असावे? गुंतवणूकदारांची वर्तणूक हेच त्याचे समर्पक उत्तर असू शकते. २००० आणि २००१ साली या योजनेने सरासरी ५०% परतावा दिला होता. आणि अशाच वेळी नवख्या गुंतवणूकदारांना बक्कळ परताव्याचे स्वप्न पडू लागतात. ज्यांनी या दोन वर्षांचा परतावा बघून गुंतवणूक सुरु केली त्यांना २००२ या वर्षात उणे १३% परतावा बघावा लागला. मग काय झाले असेल? हे सुज्ञास सांगणे न लगे.
Buy Low, Sell High! हा गुंतवणूकीचा मुलभूत नियम. पण कुठे? फक्त कागदावर. प्रत्यक्षात अनुकरण मात्र उलटेच असते. जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा गुंतवणूकदारांच्या मनावर FOMO (Fear Of Missing Out) स्वार झालेला असतो आणि बाजार अस्थिर व्हायला लागला कि त्यांचा ताबा HOMO (Hurry Of Moving Out) घेत असते. आणि या योजनेच्या बाबतीतही तसेच झाले. १९९९ चा डॉट कॉम बबल, २००१ चा अमेरिकेवर झालेला हल्ला या घटनांचा परिणाम बाजाराला अस्थिर करणारा होता. पण बाजाराची अस्थिरता दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी लाभदायक असते, हे मात्र सामान्य गुंतवणूकदार कधीच लक्षात ठेवत नसतो. त्यामुळेच तो Buy High, Sell Low! अशी कृती करतो आणि तोटा खिश्यात पाडून घेत असतो.
मार्च-एप्रिल २०२० च्या करोना वादळाने बाजारात दाणादाण उडविली होती. तेव्हा घाबरलेले गुंतवणूकदार पडेल भावात विकायला तयार होते. जे थांबले त्यांना न भूतो न भविष्यति असा लाभ दिसला. परंतु असंख्य गुंतवणूकदारांनी समभाग संलग्न योजनांचे परतावे बघून मालमत्ता विभाजन बदलण्यास आपापल्या सल्लागारांना भाग पाडले त्यांची मानसिकता FOMO प्रकारात मोडत होती. चढ्या भावात बदललेले मालमत्ता विभाजन स्थिर परतावा देण्यास पुरेसा कालावधी जाऊ द्यावा लागेल, हे मात्र ते सपशेल विसरले होते. मग नकारात्मक परतावा पाहून HOMO कृती करण्यास सध्या लगीनघाई सुरु झाली आहे.
सिजीएम फोकस फंडाला लाभ झाला परंतु गुंतवणूकदारांना नाही. त्यामुळेच शेअर बाजारातील अस्थिरता ही एका गटाला तारक तर दुसऱ्या गटाला मारक असते, हे वैभवच्या प्रश्नाला उत्तर. जर तुम्ही एप्रिल २०२० च्या नंतर म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरु केली असेल तर मार्च २०२९ पर्यंत थांबायला हवे. अस्थिर बाजारात स्थिर राहणे, हाच सिजीएम फोकस फंडाच्या कथेतून मिळालेला गुंतवणूक साक्षरतेचा मूलमंत्र.
– अतुल कोतकर
गुंतवणूक सल्लागार
94 23 18 75 98