शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राज्यात संपर्क अभियान
बबन घाेलप शिंदे गटात ?
शिर्डीतून शिवसेनेकडून (ठाकरे)इच्छुक असलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
यावेळी त्यांच्या समवेत खा. सदाशिव लोखंडे उपस्थित होते.
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव संवाद यात्रेसाठी दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौर्यासाठी आलेले आहेत. आज मंगळवारी सकाळी नेवासा तालुक्यात त्यांचे आगमन झाले. तर बुधवारी दुपारी संगमनेरात त्यांची जाहीर सभा होणार आहे. दरम्यान राज्यात घडत असलेल्या घडामोडी व बदलत असणारे समीकरण या पार्श्वभूमीवर तसेच महाविकास आघाडीत असणार्या परंतु काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे येत आहे. दरम्यान याचवेळी शिर्डी लोकसभा मतदार संघातून इच्छुक असलेले शिवसेनेचे जुने नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने घोलप शिंदे गटात जाणार का? आणि जर ते शिंदे गटात गेले तर या दौर्यात उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का बसणार आहे. या पार्श्वभुमीवर ते संगमनेरात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी शनिशिंगणापूर येथे दर्शन घेऊन त्यानंतर त्यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात दौरा सुरू केला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणीस सुरवात केली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचे सर्वेतून बोलले जात आहे. पंरतू महाविकास आघाडीतील नेते मात्र पक्षांतर करून भाजपमध्ये जाऊ लागले आहेत. शिवसेना राष्ट्रवादी फुटीनंतर आता काँग्रेसला मोठी गळती लागली आहे. तर शिवसेनेतून अजूनही आऊट गोईंग सुरूच आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने राज्यात संपर्क अभियान सुरु केलेले आहे. दोन वर्षांपूर्वी पक्षात पडलेल्या उभ्या फुटी नंतर पक्ष पुन्हा एकदा सावरण्यासाठी लोकसभा निवडणूक महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांच्या हतातून पक्ष त्यानंतर चिन्ह गेले. तसेच अनेक सहकारी सोडून गेले आहे. तर सत्ता समीकरणामुळे जागा वाटपात अपेक्षित जागा मिळत नसल्याने अनेकजण ठाकरेंना सोडून पक्षांतर करत आहे. पक्षाची ही गळती रोखण्यासाठी तसेच शिवसैनिकांना प्रोत्साहन देऊन आगामी निवडणूकीत भरीव यश संपादन करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राज्यात संवाद यात्रा सुरू केली आहे. या यात्रेत पदाधिकार्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
शिर्डी मतदारसंघ हा गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला बनला आहे. मात्र शिवसेनेचा खासदार फार काळ शिवसेनेसोबत राहत नाही असा इतिसाह निर्माण झाला आहे. भाऊसाहेब वाकचौरे खासदार झाल्यानंतर पुढील निवडणूकीत त्यांनी शिवसेना सोडली. तर दोन वेळा खासदार केलेले सदाशिव लोखंडे यांनी देखील ठाकरेंना दगा दिला.तर शिवसेनेचे निष्ठावान म्हंटले जाणारे माजी मंत्री बबनराव घोलप देखील शिंदे गटाच्या संपर्कात गेले आहे. मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुन्हा घरवापसी केल्याने पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत शिर्डी लोकसभेसाठी त्यांची उमेदवारी जवळपास नक्की केली आहे. त्यासाठी पुर्वतयारी म्हणून नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघात दोन दिवस दौर्यासाठी ठाकरे आलेले आहेत. त्यामुळे ते या दोन दिवसात जिल्ह्यात पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करणार आहे.
बुधवारी दुपारी 12.00 वाजता शहरातील बसस्थानकासमोर ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभुमीवर उबाठा शिवसेनेच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गावर उद्धव ठाकरे यांच्या स्वागातचे फलक लावून मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली आहे. तसेच या सभेच्या पार्श्वभुमीवर भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बुधवारी होणार्या या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, सहसंपर्क प्रमुख दिलीपराव साळगट, तालुका प्रमुख संजय फड, शहर प्रमुख अप्पा केसेकर, माजी शहरप्रमुख अमर कतारी, अपंग सेनेचे जालिंदर लहामगे, मुजीब शेख, संघटक कैलास वाकचौरे, अशोक सातपुते, पप्पू कानकाटे, अमोल कवडे, गुलाब भोसले आदिंनी केले आहे.