निश्चित वेळेत समस्या निवारण न झाल्यास कामगारांसह रास्ता रोको करणार
औद्योगिक वसाहतीतील 11 के.व्ही. कनेक्शनचे कंडक्टर हे 40 वर्ष जूने झाले आहेत, त्यामुळे सतत वीज खंडीत होत आहे. परंतू ते बदलण्याची मानसिकता वीज वितरण अधिकार्यांची नाही. विशेष म्हणजे वीज वितरण कंपनीस अत्यंत अल्प दराने औद्योगिक वसाहतीने भाडेपट्टा कराराने 34 आर जागा ही वापरास दिली आहे. या जागेतूनच बर्याचशा गावांना तसेच उद्योगांना वीज वितरण होत असते याचेही काहीही सोयरेसुतक या अधिकार्यांना नाही.
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – शहराच्या विकासात महत्त्वाची भुमिका बजावणारी व हजारो हातांना काम उपलब्ध करुन देणार्या संगमनेर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांवर वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे हवालदिल होण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षे पत्रव्यवहार, अधिकार्यांचे आश्वासन यानंतरही या दुष्टचक्रातून सुटका न झाल्याने आज अखेर नाईलाज म्हणून संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योजकांनी कार्यकारी अभियंत्यांकडे आपले म्हणणे मांडले आहे, तसेच आश्वासन दिलेल्या वेळेत सदर अडचणी न संपल्यास बुधवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचार्यांसह वीज वितरण कंपनीविरोधात रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
अनियमित वीज, सततचे ट्रिपिंग, गुंतागुंतीचे वायरींचे जाळे आणि नादुरुस्त झालेले वीज रोहित्र, वसाहतीबाहेर कुठलीही कल्पना न देता दिलेले कनेक्शन, रोहित्रांच्या क्षमतेपेक्षा जास्त वीज वितरण करणे अशा अनेक समस्यांशी येथील उद्योजक झुंज देत आहेत. ज्या जोडणीमधून औद्योगिक वसाहतीसाठी वीज दिली जाते त्याच जोडणीतून शहरातील इतर उद्योगांना तसेच मालदाड, जवळे कडलग, निमोण आदि गावांना वीज पुरवली जातो. या उद्योगांमध्ये किंवा गावांमध्ये कुठेही काही अडचण आल्यास औद्योगिक वसाहतीतील वीज खंडीत होते त्यामुळे उद्योजकांचे लाखोंचे नुकसान होते. सध्या औद्योगिक वसाहतीत 197 कारखाने कार्यान्वित असून त्यातील जवळपास 50 उद्योग हे अखंडीतपणे सुरु असतात. कुठलीही पुर्व कल्पना न देता वीज बंद झाल्यास या कारखान्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच सदोष रोहित्रांमुळे बर्याच उद्योगांचे मशिनरी, उपकरणे कायमचे खराब होतात. आधीच लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन मोठ्या जिकीरीने हे उद्योग सुरु आहेत त्यात टाळता येण्यासारख्या परंतु सुधारणा करण्याची इच्छाच नसलेल्या वीज वितरण अधिकार्यांमुळे उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. शेवटी नाईलाजाने आज उद्योजकांनी रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी अहमदनगर, तहसिलदार, पोलिस निरीक्षक, व वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आली आहे. यावेळी संस्थेतील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.