दोन एमआयडीसीमुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला मिळणार गती

एमआयडीसी मंजूरीमुळे विखें तुपात, रोहित पवार मात्र सुपात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर
– महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व दक्षिण नगर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे नगर जिल्ह्यात दोन नव्या एमआयडीसींना राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती प्राप्त होणार असून शिर्डी आता संत नगरी बरोबरच औद्योगिक नगरी होणार आहे. जिल्ह्यातील नगर जवळील वडगाव गुप्ता या ठिकाणी सहाशे व शिर्डी येथे पाचशे एकरावर एमआयडीसी साकारणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्याने 15 हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. रोजगाराबरोबरच इतर नवीन उद्योग, व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे. मुंबई येथे नुकतेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत नगर जिल्ह्यातील दोन एमआयडीसीना राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे.

या बैठकीनंतर खासदार विखे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जिल्ह्यात सातत्याने प्रयत्न करत आहोत. जिल्ह्यात नवीन उद्योगांना चालना मिळावी, बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, स्थानिकांचे स्थलांतर रोखावे यासाठी सातत्याने करण्यात येणार्‍या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगर जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसी संदर्भात मागणी केलेली होती. या मागणीच्या अनुषंगाने या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीत नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता येथील शासकीय 60 एकर जमीन फेज टू साठी हस्तांतर करण्याचा निर्णय झाला असून शिर्डी येथील शेती महामंडळाच्या 500 एकर जमिनीवर दुसर्‍या एमआयडीसीला तत्वतः मंजुरी मिळाली.


दरम्यान राज्यातील ही पहिलीच अशी एमआयडीसी असणार आहे की, ज्यासाठी शेतकरी तसेच खाजगी जमीन मालकाची जमीन संपादित केली जाणार नाही. या जमिनीचे आगाऊ हस्तांतर महसूल विभागाकडून करण्यात येणार असून त्यामुळे एमआयडीसीचे ले आउट आणि निर्माण कार्य होण्यास गती मिळणार आहे. साईबाबांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या शिर्डीत संत नगरी उभारल्यानंतर आता एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग नगरी उभारण्यात येत आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिर्डी हे आता मुख्य केंद्र बनणार आहे. खासदार सुजय विखे यांच्या विजनमुळे नगरसह शिर्डी मतदार संघात बेरोजगाराच्या हाताला काम मिळून जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. जिल्ह्यात या दोन एमआयडीसी बरोबरच अनेक ठिकाणी एमआयडीसी साठी इतर राजकीय नेत्यांकडून प्रयत्न केले जात होते मात्र या प्रयत्नात ना.विखे व खा. विखे यांनी आघाडी घेतली आहे. विखे परिवाराने प्रवरा परिसराबरोबरच जिल्ह्यात सहकार फुलवला. तर आता एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याची ओळख उद्योगनगरी होण्यास वेळ लागणार नाही.


दोन एमआयडीसीच्या माध्यमातून विखेंना अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. निलेश लंके यांना अप्रत्यक्षपणे सुपा एमआयडीसीचा फायदा होत आहे. निर्णय घेताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्परतेने बैठक घेतली. मात्र रोहित पवार यांनी आंदोलन करून सुद्धा त्यांच्या वाट्याला काही येईल याची शंकाच आहे. सत्तेत काका असूनसुध्दा आता आ. रोहित पवार यांना कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या कामासाठी झगडावे लागत आहे. तर दादा गटाचे आ. लहामटे यांनी राजूर साठी मागणी केली होती मात्र त्यांनाही यश आले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख