दोन कॉलेज तरूणांचा प्रवरेत बुडून मृत्यु
दोन्ही तरूण अकोले तालुक्यातील
एकाला वाचविण्यात यश
अकोले शहरातील 18-20 वयोगटातील 5 कॉलेजमित्र पोहण्यासाठी संगमनेरातील गंगामाई घाटावर गेले असता. यातील तीन तरूण खोल खड्यात पोहत असतांना बुडून बेपत्ता झाले. मात्र इतरमित्र व आजूबाजूच्या पोहणार्यांनी तत्काळ पाण्यात उड्या मारून बुडणार्या या तिघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र बर्याच वेळानंतर यातील एक तरूणाला बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र बराच उशिर झाल्यानंतर एकाचा मृतदेहच हाती लागला. तर दुसरा तरूण बेपत्ता असल्याने त्याचा शोध सुरू होता अखेर बर्याच वेळानंतर त्याचाही मृतदेह या पथकाच्या हाती लागला. ही दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी चार च्या सुमारास गंगामाई घाटावर घडली.
निलेश माधव अस्वले वय 18 रा. नवलेवाडी ता. अकोले.
अमोल उत्तम घाणे वय 18 रा.शिवाजीनगर ता. अकोले असे या मयत झालेल्या दोन तरूणांचे नाव आहे. यासबाबत समजलेली माहिती अशी की संगमनेर शहरात शिक्षणासाठी अकोले येथील निलेश माधव अस्वले रा. नवलेवाडी याने अमृतवाहिनी इंजिनीरींग पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता परंतु काही कारणास्तव तो आपला प्रवेश रद्द करण्यासाठी संगमनेरला आला होता. या वेळी त्याच्या सोबत अमोल उत्तम घाणे वय 18 रा. शिवाजीनगर, अकोले व युवराज नवनाथ धुमाळ वय 18 रा. धुमाळवाडी हे देखील आले होते. दुपारी आपला प्रवेश निलेश व त्याचे हे दोन मित्र तसेच अमृतवाहिनी कॉलेजमधील ऋतुराज मच्छिंद्र थोरात वय 19 रा. घुलेवाडी, हर्षल युवराज भुतांबरे वय 18 रा. घुलेवाडी असे हे 5 जण गंगामाई घाटावर पोहण्यासाठी गेले होते . दरम्यान यातील निलेश अस्वले, अमोल घाणे, युवराज धुमाळ असे तिघे जण गंगामाई घाटावरील खोलपाण्यात पोहत होते. पोहतांना निलेश व अमोल यांचा दम तुटला व ते पाण्यात बुडू लागले आणि त्यांना वाचवण्यासाठी युवराज हा त्यांच्या मदतीला धावून गेला. मात्र या दोघांनी युवराजलाही पाण्यात ओढले. युवराजने कसाबसा आपला जीव वाचवला मात्र निलेश आणि अमोल बुडाले. ही घटना पाहून त्यांच्या इतर मित्रांनी व अजूबाजूच्या मित्रांनी त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला मात्र बर्याच वेळाने निलेशचा मृतदेह हाती आला. तर सायंकाळी उशिरा अमोल घाणे याचाही मृतदेह हाती आला असून ते मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
वाळूउपसामुळे होणार्या खड्ड्यांने या दोन तरूणांचा बळी घेतला असून या तरूण विद्यार्थ्यांच्या निधनाने अकोले तालुक्यात शोककळा पसरली आहे.