पठारभागात गुटख्याचा मोठा साठा – 9 जणांवर गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- घारगाव पोलिसांनी पठार भागातील कुरकुटवाडी येथे मोठी कारवाई करत लाखो रुपयांच्या गुटख्यासह तब्बल 24 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्यात गुटखा विक्रीला बंदी असतानाही पठार भागातील कुरकुटवाडी येथे गुटख्याची विक्री होत होती. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केले असता काहीजण विक्री करण्याच्या तयारीत होते. कुरकुटवाडी परिसरातील कोटमारा धरणाच्या कडेला रस्त्यावर काहीजण बेकायदेशीर रित्या गुटख्याची विक्री करण्याच्या तयारीत होते. पोलिसांना या ठिकाणी महिंद्रा कंपनीची पांढर्या रंगाची पिकअप गाडी नंबर एम. एच. 10 सी. आर. 9762, सुझुकी कंपनीची पांढरे रंगाची ईको गाडी क्रमांक एम. एच. 01 डी. ई. 7966 ही दोन वाहने आढळून आली.
पोलिसांनी या ठिकाणी कारवाई करून 6 लाख रुपये किमतीच्या हिरा पानमसाल्याचे एकुण 40 गोण्या जप्त केल्या. याशिवाय विविध कंपन्यांच्या गुटख्यासह दहा लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पिकअप गाडी जप्त केली. याशिवाय दोन लाख दहा हजार रुपये किमतीच्या हिरा पानमसाल्याचे एकुण 14 गोण्या, प्रतिबंधीत सुंगधीत तंबाखुच्या एकुण 7 गोण्या, 5 लाख रुपये किमतीची सुझुकी कंपनीची ईको गाडी, 50 हजार रुपये किमतीचे सिंफनी कंपनीचे 6 कुलर, अविनाश कमलाकर यांच्याकडे 2 हजार रोख रक्कम, संदीप शिंगवान यांचेकडे 8 हजार रुपये रोख रक्कम, सागर नाईकवाडीकडे 3 हजार रुपये रोख, 4 मोबाईल असा एकूण 24 लाख 29 हजार 994 रुपयांचा ऐवज जप्त केल
याबाबत पोलीस नाईक संतोष खैरे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अविनाश आण्णा कमलाकर, पिकअप चालक प्रमोद सदाशिव मोरे (दोघे राहणार रुई, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर), ईको गाडी चालक संदीप गोरक्षनाथ शिंगवान (रा. धामणगांव, ता. अकोले), सागर रमेश नाईकवाडे (रा. धामणगांव, ता. अकोले), संदीप शिवाजी वाळुंज (रा. धामणगांव), प्रकाश आनंदराव पाटील (रा. कोल्हापुर नाका, इचलकरंजी), शुभम चेंडके (रा. शिवणकवाडी, ता. शिराळ, जि. कोल्हापुर), सनि उर्फ सनिल रमेश नाईकवाडे (रा. धामणगांव, ता. अकोले), पिकअप गाडी नंबर एम. एच. 10 सी. आर. 9762 चा मालक या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.