तालुक्यातील पंचवीस हजार नागरीकांची तहान भागवत आहे बारा टँकर

0
1784

सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची भीषणता होणार आणखी तीव्र

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर
– तालुक्यात पुरेसा पाऊस न पडल्याने पठार भाग तहानला आहे. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची दाहकता वाढल्याने 16 गावे व 41 वाड्यातील 25 हजार 774 नागरिकांची तहान 9 शासकीय व 3 खाजगी अशा 12 टँकरने पाणी पुरवठा करून भागवली जात आहे. तालुक्यातील 21 गाव टंचाईग्रस्त असल्याची माहिती गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी गुरुवारी दिली. प्रस्ताव प्राप्त होताच उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.


पावसाळ्याचा सप्टेंबर महिना शेवटच्या टप्प्यात असताना अद्याप संगमनेर तालुक्यात पुरेसा पाऊस नाही. दुबार पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. भर पावसाळ्याच्या मोसमात पिण्याच्या पाण्यासाठी पठारभाग व तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यात नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पठारातील डोळासणे, मालेगाव पठार, कर्जुले पठार, गुंजाळवाडी पठार, भोजदरी, पोखरी बाळेश्वर, पिंपळगाव देपा, वरवंडी, खांबे, काकडवाडी, पानोडी, चौधरवाडी, कुंभारवाडी, दरेवाडी, शेंडेवाडी, खरशिंदे, सावरगाव घुले, सावरचोळ, मोधळवाडी व दुष्काळी पट्ट्यातील खांजापूर, सायखिंडी आदी 16 गावे व त्यातील 41 वाड्यांना 12 टँकरने 38 खेपांद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. पाण्याच्या स्रोतासाठी संगमनेर खुर्द, रायतेवाडी ग्रामपंचायत व औरंगपूर येथील रावसाहेब पंडित शिंदे यांची खासगी विहीर तसेच मालेगाव पठार येथील राजेंद्र प्रभाकर भोर, शेंडेवाडी येथील हरी उमा काळे यांचे खासगी बोअर पंचायत समिती प्रशासनाने आधिग्रहीत केले.पठार भाग व दुष्काळी पट्ट्यातील सर्व हातपंपांची दुरुस्ती करण्यात आली असली तरी भूगर्भातील पाणी पातळी घटल्याने काही हातपंप बंद आवस्थेत आहेत. निमोणच्या 4 वाड्या, हिवरगाव पठारच्या 6, तर सोनेवाडी व पारेगाव बुद्रुकच्या प्रत्येकी 1 वाडीचे प्रस्ताव पाण्याच्या टँकरसाठी पंचायत समितीकडे प्राप्त झाले. सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस न झाल्यास पिण्याच्या पाण्याची भीषणता तीव्र होणार आहे. टँकरच्या संख्येतही वाढ करावी लागणार असल्याची माहिती टंचाई विभागाचे वरिष्ठ सहायक संजय अरगडे यांनी दिली. दरम्यान पठार भागातील गावांत उन्हाळ्यापासून उद्भवलेली पाणी टंचाई अद्यापही कायम आहे. तालुक्यातील 21 गावांना पावसाळ्यातही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यात जेमतेम 45 टक्के पावसाची नोंदसंगमनेर तालुक्यात 14 सप्टेंबरपर्यंत फक्त 45 टक्के पावसाची नोंद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here