विखेंना शह देण्यासाठी मिळाली मोठी संधी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का देत एका दगडात दोन पक्षी मारण्याची किमया साधली आहे. तर हीच नामी संधी शोधून काँग्रेसचे वरीष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी देखील नगर दक्षिणच्या निवडणुकीत लक्ष घालून आपल्या पारंपरिक विरोधकाला नामोहरम करण्यासाठी आपली संपूर्ण ताकद शरद पवारांच्या उमेदवारामागे उभी केली आहे.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पारनेरचे युवा आमदार निलेश लंके यांनी शनिवारी रात्री महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची संगमनेर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात व पारनेरचे राहुल झावरे हे उपस्थित होते. आमदार थोरात यांची भेट घेऊन निलेश लंके यांनी त्यांचे आशिर्वाद घेत विजयाचे कानमंत्र घेतले. यावेळी निलेश लंके म्हणाले की, लोकनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी सुसंस्कारित राजकारण केले आहे. राजकारणामध्ये ज्या नेत्यांबद्दल सर्वांना आदर आणि आत्मीयता आहे. त्यामध्ये आदरणीय बाळासाहेब थोरात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर विधानमंडळात कामकाज करताना त्यांनी सातत्याने मला मदत केली.
आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, निलेश लंके यांची आमदारकीची यशस्वी आणि लोकप्रिय कारकीर्द राहिली आहे. सामान्य जनतेसाठी झटणारा, पळणारा कार्यकर्ता अशी त्यांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन काम करणारे नेतृत्व आहे. सर्वसामान्य नागरिक आणि युवकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. नगर दक्षिणमध्ये समोरचे उमेदवार मोठे आहे मात्र हा लहान कार्यकर्ता असला तरी गुणी आहे.
दरम्यान राज्यात अनपेक्षित सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आ. थोरातांचे पारंपरिक विरोधक राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यात मंत्री झाले. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील जबाबदारी त्यांच्याकडे आली. त्यानंतर मात्र जाणिवपूर्वक संगमनेर तालुक्यावर अन्याय करण्याचे धोरण, अंतर्गत राजकारणात हस्तक्षेप, दबाव तंत्र, कार्यकर्त्यांना त्रास, फोडाफोडी, विकासकामांना स्टे, विकासकामांचे श्रेय लाटणे असे अनेक प्रकार मागील एक दिड वर्षात घडले. त्यामुळे आ. थोरात व त्यांचे कार्यकर्ते चांगलेच अडचणीत आले आहे. तसेच विखेंची वाढती ताकद व त्यातून आगामी काळात आणखी वाढणारा त्रास यामुळे ही लोकसभा निवडणुक म्हणजे चालून आलेली मोठी संधी आहे. त्यामुळे आ. थोरात आपली संपूर्ण ताकद निलेश लंके यांच्या पाठीशी उभी करणार यात शंका नाही. त्याच बरोबर नगर दक्षिणेतील पक्षांतर्गत नाराज व विरोधक यांची देखील मोळी बांधून भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पराभवासाठी प्रयत्न करणार असे दिसते.