यावर्षी गणेशोत्सव व दहीहंडी व मोहर्रम उत्सव विना निर्बंध साजरे करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. फडणवीस म्हणाले की, आज काही महत्त्वाचे निर्णय मुख्यमंमत्र्यांनी घेतले आहेत. गणेश उत्सवाबाबत समन्वय समितीसोबत बैठक झाली. मूर्तिकारांच्या प्रतिनिधींचाही यात समावेश होता. त्यांच्या मागण्या समजून घेत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. कोविड काळात गणेश उत्सव साजरा करता आला नाही. हे लक्षात घेत आम्ही सकारात्मक निर्णय घेतले आहेत, असे फडणवीस म्हणाले.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोविड काळात सण-उत्सवाला मर्यादा होत्या; पण यंदा मंडळांचा उत्साह आहे. हे लक्षात घेता गणेशोत्सव, दहिहंडी, मोहर्रम हे सण धडाक्यात साजरे व्हावेत याबाबत बैठकीत चर्चा झाली. यात कायदा सुव्यवस्था राखून शांततेत उत्सव व्हावे म्हणून सर्व प्रशासन, जिल्हा आणि पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, व्यवस्थित आणि सुरळीत उत्सव पार पडावे यासाठी विसर्जन मार्गातील खड्डे दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. मंडप आणि अन्य परवानगी सुरळीत मिळावी यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित करत आहोत. अटी-शर्थी लावू नये, असे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मंडळांना नोंदणी शुल्क आणि अनावश्यक शुल्कातून सुट दिली गेली. हमीपत्रही आता गणेश मंडळांकडून घेणार नाही. उत्सव साजरा करताना सामाजिक बांधिलकी, समाजप्रबोधनाचे नियम पाळावेच, पण त्याचे अवडंबरही प्रशासनाकडून होता कामा नये अशा सूचना मी दिल्या. कोविड काळात गणेश मूर्तीच्या उंचीवर मर्यादा होती ती आता काढून टाकली आहे. सर्व अधिकारी, प्रशासनाने सकारात्मक भूमिका गणेशोत्सव साजरा करताना घ्यावी. विसर्जन घाटावर आणि विसर्जन मार्गावर लाइट व्यवस्था केली जाणार आहे.
हा उत्सव सर्वांचा आणि राज्यातील सर्वात मोठा उत्सव आहे त्यासाठी राज्यशासन मदत करेल. धर्मदाय नोंदणीचा प्रश्नही सोडवला असून ध्वनी प्रदूषणाच्या किरकोळ केसेसही काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. दहीहंडीत थराच्या नियमांचे पालन करावे अशा सूचनाही मी दिल्या आहेत. यंदा सर्वांचा उत्साह जोरात आहे. दरवर्षी मुंबई पुणे कोकणात गणेश उत्सवासाठी जाणाऱ्या वाहनधारकांना टोलमाफी देत आहोत दरवर्षी ही टोलमाफी होते. पीओपी गणेश मुर्तीबाबत एक समिती गठीत करण्यात आली आहे. यंदा यावर सूट दिली असून पुढील वर्षी ठोस निर्णय घेऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने पीओपी मूर्ती, पर्यावरण संरक्षणाबाबत एक धोरण तयार करण्याचे सांगितले. आम्ही यासाठी एक समिती स्थापन केली असून यापूर्वीचे न्यायालयाचे आदेश, निर्देशाचे पालन करून वैज्ञानिक पर्यावरण पूरक धोरण आम्ही न्यायालयाकडे सादर करू.