बसस्थानकात दारुडे, गर्दूल्ले यांचा वावर

sangamner bus Stand

प्रवासी त्रस्त

जबाबदारी झटकण्यात प्रशासन व्यस्त


युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहर बसस्थानकाची केवळ भव्यतेची वाहवा होत असते. मात्र हेच भव्य दिव्य बसस्थानक आता समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. बसस्थानकाची हिच भव्यता आता प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. येथील अस्वच्छता, भिकार्‍यांचा वावर, चोरांची दहशत तर रात्री दारुडे, गर्दूल्ले यांची गुंडागर्दी, अरेरावी आणि दादागिरी प्रवाशांसाठी मोठी जीवघेणी ठरत आहे. दरम्यान याबाबत येथील वाहतूक निरीक्षक, व्यवस्थापक, सुरक्षा रक्षक यांच्याकडे तक्रार केल्यास ते स्वतः ची जबाबदारी तर झटकतातच उलट इकडे जा तिकडे जा, आम्हाला तेव्हढेच काम आहे का असे उलट प्रश्‍न करून आपली जबाबदारी झटकतात. अशाच एका त्रासदायक प्रकरणाचा फटका अकोले येथील एका एलआयसी अधिकार्‍याला व त्यांच्या कुटुंबाला बसला.
एलआयसी अकोले शाखाधिकारी श्री. रत्नपारखी हे काल रात्री 9 ते 10 या वेळेत संगमनेर बसस्थानकावर सपत्नीक आले होते. त्यांच्या मुली पुणेहून येणार म्हणून ते या ठिकाणी थांबलेले होते. त्यावेळी काही गर्दुले, गुंड प्रवृत्तीचे लोक नशापाणी करून काही प्रवाशांना त्रास देत होते. रत्नपारखी यांनी एकाला जाब विचारला तर त्याने उलट रुबाब करत याठिकाणी आमचे कुणीही काही वाकडे करू शकत नाहीत. यासंदर्भात रत्नपारखी यांनी आगारातील माहिती कक्ष, अन्य अधिकारी यांचे या गंभीर प्रश्‍नांकडे लक्ष वेधले मात्र कुणी साधे म्हणणे ऐकून किंवा तक्रार घ्यायला धजावले नाहीत, गेट वर जा म्हटले तर गेटवरील माणूस म्हणतोय आम्हाला तेव्हढेच काम आहे का.? मात्र रत्नपारखी यांनी धीटपणा दाखवत या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सामोरे गेले. याची माहिती अकोलेचे पत्रकार अमोल वैद्य यांना समजल्यानंतर त्यांनी त्यांचे मित्र गणेश धात्रक व अन्य मित्रांना सांगून मदत करायला सांगितले. हे मित्र बसस्थानकावर पोहचल्यावर ते दारुडे तेथून निघून गेले.


दरम्यान रत्नपारखी यांना मित्रांमुळे मदत मिळाली परंतु इतर प्रवासी ज्यांचे कुणी ओळखीचे नाहीत त्यांची काय परिस्थिती? ज्यांच्या कक्षेत ही बाब तेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, तर सर्वसामान्य नागरिकांनी जायचे कुठे? असे अनेक प्रश्‍न निर्माण होत आहे. किमान पोलीसांनी या परिसरात गस्त वाढवायला हवी, म्हणजे या दादागिरी करणार्‍या गुंडाना धडा मिळेल. एक, दोन जनांवर कारवाईचा बडगा उगारल्या शिवाय हे सर्व रात्री-बेरात्रीचे होणारे प्रकार थांबणार नाही. केवळ बस सोडणे, तिकीट फाडणे, प्रवासी ने आण करणे एव्हढेच काम बसस्थानक अधिकारी कर्मचार्‍यांचे नाही तर प्रवाशांची सुरक्षा व काळजी घेणे ही सुद्धा जबाबदारी आहे. परंतू येथील प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याने या भव्य बस्थानक समस्येच्या विळख्यात अडकले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख