मराठ्यांचे वादळ पुण्यात धडकले

0
1462

मुंबईतील गल्ली-गल्लीत मराठे पाहायला मिळतील – जरांगे

मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरू होणार्‍या सर्वेक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज ठेवा. या कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊन कालबद्ध रीतीने अचूक सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गावोगावी दवंडी द्या, सूचना फलकांवर माहिती द्या, लोकांना या सर्व्हेविषयी कळू द्या अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रशासनानेही पूर्ण शक्ती एकवटून काम करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त उपस्थित होते.

युवावार्ता (प्रतिनिधी)
पुणे –
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. जालना, बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तिसर्‍या दिवशी म्हणजेच 22 जानेवारीचा मुक्काम त्यांनी रांजणगाव गणपती येथे केला. आज सकाळी पुन्हा 10 वाजता जरांगे यांनी लाखो मराठ्यांसह मुंबईकडे कूच केली. यावेळी आज दुपारच भोजन भीमा कोरेगाव येथे झाले. तर आजचा मुक्काम पुणे जिल्ह्यातील चंदननगर येथे केला जाणार आहे. विशेष म्हणजे आज आणि उद्याचा प्रवास करून 26 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईत धडकणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी यापूर्वी आंतरवाली सराटीत आमरण उपोषण केले. यावेळी दोनदा जरांगे यांनी सरकारला वेळ दिला होता. मात्र, त्यानंतर देखील मराठा आरक्षणाचा प्रश्न काही सुटला नाही. त्यामुळे आता मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर अमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यासाठी 20 जानेवारीपासून त्यांनी पायी दिंडी काढली आहे. त्यांच्या याच मुंबई आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. दरम्यान, जरांगे यांनी मुंबई आंदोलन स्थगित करावे अशी मागणी सत्ताधारी नेतेमंडळी आणि मंत्र्यांकडून केली जात आहे. मात्र, आतापर्यंत सरकारला सात महिन्याचा वेळ दिला, यापुढे आता एक तास ही मिळणार नाही. आणि आम्ही मुंबईत आंदोलन करणारच या भूमिकेवर मनोज जरांगे ठाम आहेत. जरांगी यांच्या याच भूमिकेमुळे सरकारची अडचण मात्र वाढली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या पायी दिंडीत सहभागी होणार्‍यांची संख्या मोठी असली, तरीही अनेकजण अजूनही या आंदोलनात सहभागी झाले नसल्याचं जरांगे म्हणाले आहे. आम्ही गनिमी काव्याने मुंबई गाठणार असल्याचे देखील जरांगे म्हणाले आहे. त्यामुळे 26 जानेवारीला मुंबईतील गल्ली-गल्लीत मराठे पाहायला मिळतील असा थेट इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here