शहरातील रस्ते धूळ, खड्ड्यांनी व्यापले

0
1338

नागरीकांचे आरोग्य धोक्यात

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – गेल्या दोन वर्षापासून पालिकेवर प्रशासकराज असल्याने अधिकारी कर्मचार्‍यांवर कोणाचाच वचक राहिला नाही.
शहरातील विविध प्रभागात अनेक ठिकाणी अस्वच्छता, खराब व धूळयुक्त रस्ते तयार झाले असून त्याकडे कुणाचे लक्ष नाही. शहरात डासांचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे ज्ञनागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहरातील नवीन अकोले रस्त्यावर ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. रस्त्यावरील डांबर उडून गेल्याने खडी उघडी पडून धुळीचे साम्राज्य वाढले आहे. अशीच परिस्थिती शहरातील अनेक भागात तयार होत आहे.


डासांचा उपद्रव व धुळ नागरीकांच्या नाकातोंडात जाऊन अतिसार, डेंग्यू, कावीळ, थंडी ताप, सर्दी, पडसे खोकला आदी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे. पालिकेकडून करण्यात येणारी साफसफाई व्यवस्थीत होत नसल्याने ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग, तुंबलेल्या गटारी दिसून येत आहे. याचा नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या गंभीर समस्येकडे ना कोणी लक्ष देत, ना कोणी आवाज उठवताना दिसत आहे.
प्रशासक म्हणून प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी सध्या काम पाहत आहेत. पालिकेकडे तक्रारींचा पाऊस पडत असून त्याचा निपटारा मात्र होत नाही. शहरातील विकास कामे देखील ठप्प आहेत व जे चालू आहे ते देखील अतिशय संथ गतीने होत आहेत. तक्रारी केल्यानंतर थातूरमातूर कामे करण्यात धन्यता मानली जात आहे. पालिकेच्या माध्यमातून होत असलेली कामे देखील गुणवत्तापुर्ण होत नाहीत. रस्ते, गटारी, स्वच्छता यांचा प्रश्न सध्या मोठ्या प्रमाणावर ऐरणीवर आला आहे. मात्र पालिकेत सध्या प्रशासकराज असल्याने या प्रश्नाबाबत कुणाला जाब विचारावा असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. सध्या निवडणुकीचे कोणतेही चित्र दिसत नसल्याने इच्छुक नेते सुद्धा नागरीकांच्या प्रश्नावर आक्रमक होतांना दिसत नाही. किंवा नागरीकांचे प्रश्न घेऊन पालिका पदाधिकार्‍यांना जाब विचारात नाही.
राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर संगमनेरच्या विकासा एक प्रकारे खीळ बसली असल्याचे दिसत आहे. निधी अभावी अनेक ठिकाणी नविन कामे होत नाही. अनेक रस्ते खराब होत असतांना त्याची डागडुजी देखील होत नाही. कोणतेही मोठे विकास कामे सध्ये शहरात सुरू नसतांना केवळ श्रेयवादाचे राजकार रंगतांना दिसत आहे. दिवसेंदिवस शहरात नागरी समस्या वाढत असतांना दिसत आहे. याकडे नगरपालीकेचे दुर्लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here