काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचा महसूल मंत्री विखे पाटील यांच्यावर थेट हल्लाबोल
वाळू धोरणामुळे संपूर्ण प्रशासन वेठीस ; तस्करांकडून ‘रात्रीस खेळ चाले‘
संगमनेर ( प्रतिनिधी ) राणा भीमदेवी थाटात गर्जना केलेले नवे वाळू धोरण फसलेले आहे. महसूल मंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले. त्यांच्याकडूनच आता रात्री बेरात्री वाळूची तस्करी केली जाते, सामान्य गोरगरीब माणसाला वाळू मिळणे मुश्किल झाले आहे, या वाळू धोरणामुळे नवे गुंड तयार झाले, अशा शब्दात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागावर हल्ला चढवला.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात बोलत होते. फसलेले वाळू धोरण, तलाठी भरतीत झालेले गैरप्रकार आणि कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची भरती प्रक्रिया यावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.
थोरात म्हणाले, नवे महसूल मंत्री आले त्यांनी नवे धोरण स्वीकारले. राणा भीमदेवी थाटात त्यांनी घोषणा केली की आता 600 रुपयात घरपोच वाळू मिळेल. मलाही आनंद वाटला जे आम्हाला जमले नाही ते नवे महसूल मंत्री करत आहेत, मात्र सभागृहात उपस्थित असलेल्या आमदारांनी छाती ठोकपणे सांगावे की आपल्या मतदारसंघात सहाशे रुपये दराने वाळू मिळते का? आपला मूळ प्रश्न वाळू वाहतुकीचा खर्च कमी करणे हा होता, मात्र या नव्या धोरणामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. वाळूचे उत्खनन करणे, डेपो मध्ये साठवणूक करणे, वाळूची वाहतूक करणे या सगळ्या गोष्टींसाठी जाहिराती देण्यात आल्या, हे सर्व ठेके कोणाला मिळाले याचा शोध घेतल्यानंतर लक्षात येते की, हे सर्व तर महसूलमंत्र्यांचेच कार्यकर्ते आहेत. जुन्याच वाळू तस्करांना महसूलमंत्र्यांनी सन्मानाने ठेके दिले. या वाळू धोरणामुळे प्रशासनावरही तान निर्माण झाला. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, सर्कल, तलाठी या सर्वांना डेपोचे रक्षण करण्याची वेळ आली. ज्यांना ठेके देण्यात आले त्यांच्याकडूनच वाळू वाहतुकीचे गैरप्रकार सुरू झाले. वाळूची वाहतूक रात्री करता येत नसताना देखील सर्रास रात्रभर वाळूची वाहतूक सुरू आहे. वाळूच्या डेपो मधूनच वाळूच्या चोऱ्या व्हायला लागल्या. हे सर्व करणारे लोक महसूलमंत्र्यांच्या मर्जीतले आहे, असाही घनाघात थोरात यांनी केला.
वाळूची ऑनलाईन नोंदणी हा सुद्धा गमतीशीर प्रकार झाला आहे. ऑनलाइन नोंद करायला गेल्यावर वाळू उपलब्ध नसते, वाळू कधी उपलब्ध होणार? किती वाजता ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार? किती वाजता संपणार? हे ठराविक लोकांनाच माहीत असते, अशा लोकांचे धक्कादायक रॅकेट राज्यभर निर्माण झाले आहे. मी असं म्हणणार नाही की हे सर्व भाजपचे कार्यकर्ते आहेत, मात्र महसूल मंत्र्यांच्या मर्जीतले आहेत. मी त्यांना हे खात्रीने सांगतो. महसूलमंत्र्यांच्याच काही किलोमीटर परिसरामध्ये रात्रीची वाळूची वाहतूक सुरू आहे. ती वाळूची वाहतूक करणारे मंडळी मंत्र्यांच्याच मर्जीतले आहेत. रात्रभर वाळू वाहण्याचा धुमाकूळ राज्यभर सर्रास सुरू आहे, असाही आरोप थोरात यांनी केला.
थोरात म्हणाले, या नव्या धोरणामुळे राज्याच्या तिजोरीत भर पडली नाही उलट सरकारला भुर्दंड बसतो आहे. गरीब माणसाला वाळू उपलब्ध होत नाही त्याला काळ्या बाजारातूनच वाळू विकत घ्यावी लागते, त्यालाही अतिरिक्त भुर्दंड या नव्या धोरणामुळे बसतो आहे. या धोरणाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे आणि सर्व सदस्य ते मान्य करतील. रात्री सुरू असलेल्या वाळू तस्करीमुळे माझ्या मतदारसंघात वाळूची वाहतूक करणारी एक गाडी विहिरीत बुडाली त्यात चालकाचा मृत्यू झाला, रात्रीची वाळू वाहतूक कुठेही थांबलेली नाही. महसूल विभाग आणि तस्कर यांच्या संगनमताने हे सुरू आहे. जे वाळूचे खरे गुन्हेगार आहेत त्यांना संरक्षण देण्याचे काम महसूल मंत्र्यांकडून सुरू असल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला.
तलाठी भरतीतील गैरप्रकाराला जबाबदार कोण?
तलाठी भरतीच्या परीक्षेपोटी विद्यार्थ्याकडून शंभर कोटी रुपये गोळा झाले मात्र तरीही सरकारला या परीक्षेचे व्यवस्थापन धड करता आले नाही. संभाजीनगरच्या विद्यार्थ्याला नांदेड आणि नांदेडच्या विद्यार्थ्याला अमरावती असे परीक्षा केंद्र देण्यात आले, तलाठी भरतीचा पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार?
– बाळासाहेब थोरात
कंत्राटी तहसीलदार हे राज्याला शोभणारे नाही
तहसीलदारासारखे अत्यंत जबाबदारीचे आणि गोपनीय पद कंत्राटी पद्धतीने भरण्याची जाहिरात प्रकाशित होते आणि मंत्री महोदयांना ते माहीत नसते याचा अर्थ राज्यकारभार कसा सुरू आहे याचे ते द्योतक आहे.
– बाळासाहेब थोरात