अन्यथा मोठे आंदोलन उभारू, शहर काँग्रेस कमिटीचा इशारा
युवावार्ता ( प्रतिनिधी )
संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात 10% दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. सदरची करवाढ ही अत्यंत अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. ही दरवाढ त्वरित रद्द न झाल्यास या दरवाढीच्या विरोधात संगमनेर शहर काँग्रेस कमिटी मोठे आंदोलन उभारेल असा इशारा माजी नगराध्यक्ष दिलीपराव पुंड यांनी दिला आहे.
संगमनेर नगरपरिषदेला याबाबतचे निवेदन शहर काँग्रेस कमिटीच्या वतीन देण्यात आले आहे.हे निवेदन कार्यालय निरीक्षक राजू गुंजाळ, कर निरीक्षक सादिक पटेल यांनी स्वीकारले. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप सहदेव पुंड, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सोमेश्वर दिवटे, संगमनेर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निखिल पापडेजा माजी नगरसेवक गजेंद्र अभंग, नितीन अभंग, शैलेश कलंत्री, नूर मोहम्मद शेख, राजेंद्र वाकचौरे, सौ. सुनंदा मच्छिंद्र दिघे, हैदर अली सय्यद मिलिंद औटी, बाळासाहेब पवार आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर नगरपरिषद हद्दीत संकलित कर आकारणी बाबत चतुर्थ वार्षिक रिव्हिजन पूर्ण झाली असून सन 2023-24 या वर्षासाठी प्राथमिक कर निर्धारण करण्यात आले आहे. यात शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात 10 % दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. सदरची करवाढ अत्यंत अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. तरी घरपट्टीत केलेली 10% कर वाढ त्वरित रद्द करावी. अन्यथा संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात येईल याची संपूर्ण जबाबदारी नगर प्रशासनाची राहील असा इशाराही शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आल्या असून याबाबतचे निवेदन दिले आहे.यावेळी दिलीपराव पुंड म्हणाले की, अत्यंत प्रतिकूलतेतून अनुकूलता निर्माण झालेले संगमनेर शहर आहे. काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहरात सातत्याने विविध विकासाच्या मोठमोठ्या योजना राबवल्या गेल्या आहेत. मात्र केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वत्र महागाई बेरोजगारी वाढली असून व्यापार मंदी ही झाली आहे या काळात सरकारने नागरिकांना दिलासा देण्याऐवजी कर वाढ करणे हे अत्यंत चुकीचे आहे.