अवैध पध्दतीने मुरुमाची चोरी
ग्रामपंचायतने कर्मचाऱ्याला घातले पाठिशी,
सखोल चौकशी करून कारवाई करा – काळे
महसूल विभागाला लाखोंचा चुना
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – तालुक्यातील झोळे गावातील माळ माथा परिसरातील सरकारी जागेत जेसीबीद्वारे मोठ मोठे खड्डे घेऊन अशोक नंदू एरंडे या ग्रामपंचायत कर्मचार्याने बेकायदा खनन करून त्यातील गौण खनिजाचा (मुरुम) बेकायदेशीर उपसा केला आहे. हा मुरुम स्वतः साठी वापरुन इतर मुरुमाची विक्री देखील केली आहे. याबाबत ग्रामपंचायतला माहिती व तक्रार केली असतानाही त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही. तसेच त्या कर्मचार्याला एकप्रकारे पाठीशी घालण्याचे काम ग्रामपंचायतने केले आहे. त्यामुळे आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी कल्पना भाऊसाहेब काळे (झोळे) यांनी संगमनेर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
कल्पना काळे यांनी या तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक 19 जून 2023 रोजी रात्री 11 ते पहाटे 05 वाजपर्यंत ग्रामपंचायत कर्मचारी अशोक एरंडे याने जेसीबीद्वारे अवैध पध्दतीने शासकीय जागेतून मुरुमाचे उत्खनन केले. तो मुरुम स्वतःचे शेत व परिसरात टाकला. तसेच पैसे घेऊन या गौण खनिज मुरुमाची लोकांना राजरोसपणे विक्री सुध्दा आहे. याबाबतची माहिती गोविंद खर्डे, उपसरपंच ग्रामपंचायत झोळे यांना वेळोवेळी दिली होती. सदर कर्मचारी चुकीच्या कामात गुंतला असल्याने सदर ग्रामपंचायत कर्मचार्यावर नियमानुसार कार्यवाही करावी अशी मागणी अनेक वेळा करुनही त्याचेवर अद्यापर्यंत कुठलीही कार्यवाही केली नाही. उलट त्याला पाठीशी घातले जात आहे. त्याच्या गैरवर्तणुकीला अभय देवून गौण खनिज (मुरुम) सारख्या अवैध कामाला ग्रामपंचायत कडून प्रोत्साहन दिले गेले आहे.
दरम्यान सोमवार दिनांक 03.07.2023 रोजी महसूल मंडल अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक या कर्मचार्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेत माझा जबाब नोंदविला. यावेळी अशोक एरंडे यांने किती ट्रॅक्टर मुरुम टाकले असा प्रश्न करत तक्रारदाराचीच चौकशी केली. झालेले उत्खनन व टाकलेला याची तपासणी या अधिकार्यांनी करणे गरजेचे होते. यावेळी गोविंद खर्डे, उपसरपंच ग्रामपंचायत झोळे यांनी फक्त आठ गौण खनिज (मुरुम) चे ट्रॅक्टर टाकले आहेत असे सांगून वेळ मारुन नेण्याचे काम केले. सदर बाब दिशाभूल करणारी असून, संशयास्पद व गंभीर आहे. उपसरपंच गोविंद खर्डे हे या कर्मचार्याला पाठीशी घालत असून चौकशीकामी आलेल्या समितीची सुध्दा दिशाभूल करत आहेत. त्यामुळे त्यांचा युक्तीवाद ग्राह्य न धरता चौकशी समितीने फेर आढावा घेऊन नेमके किती उत्खनन झाले आहे याचा शोध घ्यावा. ग्रामपंचायत कर्मचार्याने उत्खनन केलेल्या जागेवर समितीने पंचानामा करून नेमके किती गौण खनिज (मुरुम) चोरीला गेला आहे व शासनाचा किती कोटी रुपयाचा महसूल बुडला आहे याची तपासणी करावी. तसेच याची जबाबदारी निश्चीत करुन जबाबदार व या कामात मदत करणार्यावर संबंधीतावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. अशी मागणी कल्पना काळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली.