सुदर्शनचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्यासह बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

0
1715

चिथावनीखोर, प्रक्षोभक, धार्मिकतेढ निर्माण करणारे भाषण भोवले

संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर शहरात निघालेला सकल हिंदू भगवा मोर्चात धार्मिक तेढ निर्माण करणे, प्रक्षोभक भाषण करणे आणि त्याचे आयोजन या कारणावरून सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके, बजरंग दलाचे योगेश सुर्यवंशी आणि विशाल वाकचौरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उशिरा का होईना या मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने कायदा आपले काम करतो हे सिद्ध झाले आहे.


पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब यादव यांनी याबाबत फिर्यादी दिली. त्यानुसार या तिघांवर गु.र.नं. ५१२/२०२३ भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ३४ आणि ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहरात जोर्वे नाक्यावर हिंदू तरुणांना जीवघेणी मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधासाठी ६ जून रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवा मोर्चा काढण्यात आला होता. त्याचे पडसाद पडणार हे नक्की होते त्यानुसार समनापूर येथे दगडफेक झाल्याने हा मोर्चा चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या दगडफेकीत व त्या ठिकाणी झालेली तोडफोड व मारहाणीचे परिणाम अनेकांना भोगावे लागले आहेत. पोलिसानी त्यानंतर केलेल्या कारवाईत अनेक गुन्हे दाखल केले. अजुनही ही कारवाई सुरू आहे. दगडफेक करण्यात सहभागी असलेले तसेच त्यानंतर झालेल्या विविध आंदोलनात सहभागी असलेल्यांवर देखील पोलिसांनी विविध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर आणि नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


सकल हिंदू समजाच्या भगव्या मोर्चानंतर झालेल्या सभेत सुरेश चव्हाणके, सुदर्शन चॅनल (रा. दिल्ली) यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषण केले होते. मुस्लिम समाजाला टार्गेट करत टिका केली होती. तसेच योगेश मनोहर सूर्यवंशी (रा. अकोले नाका, संगमनेर) (बजरंग दल तसेच एकलव्य आदिवासी संघटना नेता ) आयोजक विशाल भगवान वाकचौरे (बजरंग दल, विहिप रा. संगमनेर) यांनी जातीय दंगा घडवून आणण्याकरीता बेछुटपणे, बेदरकारपणे चिथावणी देणारी भाषणे करुन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. त्यांना सदर कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या परवानगी मधील अटी व शर्ती तसेच सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी रिट याचीका क्र. 943/21 तसेच याचीका क्र. 940/22 यामध्ये दिनांक 13 /1/23 रोजी निर्गमित केलेल्या न्याय निर्णयाचे उल्लंघन केले. अशी फिर्याद पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांनी दिली. त्यानुसार हे गुन्हे दाखल करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here