राष्ट्रीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत बारा लाख विद्यार्थ्यांमध्ये अग्रेसर
व्यवस्थापन तज्ज्ञ प्रफुल्ल खिंवसरा यांची कन्या सानिया हिने मिळविलेले यश केवळ
नेत्रदिपक नसून इतरांसाठी ते प्रेरणादायी आहे.
देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणार्या प्रवेश परीक्षेत संगमनेरची सानीया प्रफुल्ल खिंवसरा राष्ट्रीय पातळीवर चमकली आहे. जेईई ‘मेन’ आणि ‘एडव्हांस’ अशा दोन प्रकारात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्या या परीक्षेत देशभरातील बारा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात 1 हजार 244 वे मानांकन प्राप्त करीत सानीयाने संगमनेरचे नाव देशाच्या पटलावर नोंदविले आहे. सानीया मालपाणी उद्योग समूहाचे कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल खिंवसरा यांची कन्या आहे.
लहानपणापासूनच अभ्यासात एकाग्र असलेल्या सानीयाचे प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये झाले आहे. सतत अभ्यासाच्या वृत्तीने तिच्या शिक्षणाचा आलेख सतत उंचावतच गेला. इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत 99 तर इयत्ता बारावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवून तिने आपल्यातील गुणवत्तेची चुणूकही दाखवली होती. सानीयाने लहानपणापासूनच राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतून शिक्षण घेण्याचे स्वप्नं बाळगल्याचे सांगतांना डॉ.रश्मी खिंवसरा यांचा अभिमान झळकत होता. मुलीने घेतलेल्या परिश्रमाचे गोडवे सांगत राष्ट्रीय प्रवेश परीक्षेसह (जेईई) महाराष्ट्र सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) मध्येही तिने अनुक्रमे 99.75 अणि 99.96 पर्सेंटाईल गुण मिळविले. राष्ट्रीय ऑलिम्पियाड (रसायन शास्त्र) मध्ये देखील देशभरातील अवघ्या एक टक्का विद्यार्थ्यांमधून सानीयाची निवड झाल्याचे डॉ.खिंवसरा यांनी सांगितले.
जेईई ऍडवान्सड परीक्षेत अभूतपूर्व यश मिळविल्याने तिला आता राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (आयआयटी) मुंबई, चेन्नई, दिल्ली, कानपूर, खरगपूर, रूडकी या देशातील सर्वाधिक प्रतिष्ठीत व आंतरराष्ट्रीयस्तरावर नामांकित असलेल्या संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो. तिने संगणक शास्त्र अथवा इलेक्ट्रीकल/इलेक्ट्रोनिक्स या विषयात अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले आहे. सानीयाने मिळवलेले हे यश संगमनेरचे नाव देशाच्या पातळीवर नेणारे आहे. या देदीप्यमान यशाबद्दल मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्यासह संचालक सर्वश्री डॉ.संजय, मनीष, गिरीश, आशिष मालपाणी यांनी सानीयाचे अभिनंदन केले आहे.