विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखून ध्येयनिश्चिती करावी- गिरिश मालपाणी

0
1599

ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये ११ वी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा
 
युवावार्ता (प्रतिनिधी) संगमनेर – “ विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आवडी निवडी आणि  क्षमता वेळीच ओळखून ध्येय निश्चिती करावी म्हणजे आपण ठरविलेले लक्ष्य गाठणे सोपे जाते” असे प्रतिपादन मालपाणी फौंडेशन चे व्हाईस प्रेसिडेंट उद्योजक गिरिश मालपाणी यांनी केले. येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये ११ वी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . त्यावेळी अकरावी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करताना श्री मालपाणी यांनी वरील प्रतिपादन केले.पडद्यावर विविध चित्रफिती व दृश्य आणि छायाचित्रे दाखवून त्यांच्या आधारे श्री मालपाणी यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या प्रभावी मार्गदर्शनात आणि चर्चेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सक्रीय सहभाग घेतला.


 
“आपल्या ध्येयाची सुरुवात कल्पनेने होते. सर्वप्रथम मनात कल्पना रुजते. मग आपण त्या दृष्टीने योजना आखतो. नंतर त्यासाठी आपण सज्ज होतो आणि निर्धार करून त्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी वचनबद्ध राहतो. अशा पद्धतीने ध्येय गाठता येते. उद्दिष्टामुळे जीवनाला अर्थ प्राप्त होतो. जगण्यात रंगत येते. जीवनाच्या सु व्यवस्थापनासाठी स्व व्यवस्थापन अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा हुशारीने वापर करावा  कारण आपली भावनिक बुद्धिमत्ता ही करिअरच्या यशासाठी आधारशिला आहे. ध्येय निश्चिती करताना संघर्ष करून जीवनात खूप उच्च स्थानावर पोचलेल्या महान व्यक्तींची चरित्रे अवश्य वाचली पाहिजेत. त्यातून प्रेरणा नावाचे प्रोटीन मिळते आणि मग ध्येय निश्चिती नावाची पाककृती (रेसिपी) रुचकर होऊन जीवनाला देखील चव येते. “ असे श्री मालपाणी म्हणाले. वाणिज्य शाखेच्या वतीने मालपाणी यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांशी मालपाणी यांनी सहज संवाद शैलीत केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना खूपच भावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here