विद्यार्थी प्रिय आणि विज्ञाननिष्ठ प्राचार्य प्रा. एम.वाय. दिघे सर

0
1882

प्राचार्य प्रा. एम.वाय. दिघे

प्राचार्य प्रा. एम.वाय. दिघे सर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र राज्यातील संगमनेर तालुका म्हटलं की शिक्षण, सहकार, राजकारण,उद्योग, व्यवसाय आणि निसर्गाचे मोठे वरदान लाभलेला हा तालुका. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेमधील सर्वात उंच “कळसुबाई” शिखराच्या पायथ्याशी उगम पावणारी “अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या” तीरावर  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात “जोर्वे” एक सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक , जरासंथ राजाच्या बृहद पदस्पर्श झालेलं ऐतिहासिक असं ‘जोर्वे संस्कृती’असलेलं जोर्वे गाव. या गावातील भिकाजी सुभाजी दिघे यांचा छोटासा परिवार. भिकाजी दिघे हे जोर्वे गावातील नावाजलेले व्यक्तिमत्व. उत्तम शेती, गुळाचे गुऱ्हाळ, पिठाची गिरणी ही दिघे कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन. दरम्यानच्या काळात शेती विभाजन झाल्यामुळे यादव दिघे आणि त्यांच्या पत्नी शेवंताबाई दिघे यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. आपली चार मुले आणि दोन मुली असा यादव दिघे यांचा परिवार. या परिवारातील मच्छिंद्र दिघे या सहाव्या अपत्याचा जन्म 1965 या वर्षी झाला. दुर्दैवानं यादवराव दिघे यांना अचानक आजारपण आलं आणि त्यांना हे जग सोडून जावं लागलं. त्यावेळी मच्छिंद्र दिघे यांचे वय अवघं आठ वर्ष होतं. आपल्या वडिलांचा चेहराही पूर्ण आठवत नसलेले एम.वाय. दिघे सर यांच्या आयुष्यातला संघर्ष खरे तर त्याचवेळी सुरू झाला. परंतु आई शेवंताबाई आपल्या मुलांना वडिलांची उणीव भासू न देता मुलांना मोठं करायचं हे ठरवलं. खरं म्हणजे ज्यांना वडील असतात त्यांना वडीलांच्या अस्तित्वाची किंमत कळत नाही. परंतू ज्यांना वडील नसतात त्यांच्या मुलांना करावा लागणारा संघर्ष इतरांपेक्षा जास्तच असतो. असं म्हणतात कि  आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांनासामोरे गेल्याशिवाय चांगल्यादिवसांची किंमत कळत नाही.

कोवळ्या वयात ओढविलेले हे संकट सर्वच भावंडांना नवीन होतं, परंतु या सर्व भावंडांनी खचून न जाता परिस्थितीशी दोन हात करत, मेहनत करून नवं विश्व निर्माण करण्याचं ठरवलं आणि सुरू झाली या भावंडांच्या आयुष्यातील संघर्षाची नवी यशोगाथा.

चालणारे दोन पाय किती विसंगतएक मागे असतो एक पुढे असतो
पुढच्याला अभिमान नसतोमागच्याला अपमान नसतो
कारण त्यांना माहीत असतंक्षणात सारं बदलणार असतं
याचच नाव जीवन असतं !

मच्छिंद्र दिघे यांचे मोठे बंधू शिवाजीराव यादव दिघे यांनी वयाच्या सतराव्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.  जोर्वे गावात दूध संकलन केंद्र नसल्याने संगमनेर येथे सायकलवर प्रवास करून दुधाचा रतीब शिवाजीराव दिघे यांनी सुरू केला. कोवळ्या वयातच भगिनी भामाबाई, सुभद्रा, बंधू रघुनाथ , पुंजाहारी आणि मच्छिंद्र या भावंडांना खूप मेहनत करावी लागली.

“If there is no struggle, there is no progress.”

प्राथमिक शिक्षण: 

मच्छिंद्र दिघे सर  यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जोर्वे येथे झाले. तसेच पाचवी ते दहावीचे माध्यमिक शिक्षण समता विद्यामंदिर जोर्वे येथे झाले. मुळातच मच्छिंद्र दिघे हे शिक्षणात हुशार असल्याने आणि मेहनती असल्याने पहिली ते दहावीपर्यंत त्यांनी वर्गामध्ये प्रथम क्रमांक सोडला नाही. इयत्ता अकरावी ते बारावी हे शिक्षण मच्छिंद्र दिघे सर यांनी ज्ञानमाता जुनियर कॉलेज संगमनेर येथे पूर्ण केले.शिक्षण चालू असताना सुट्टीच्या दिवशी ऊस तोडणी करणे,गाई-गुरांचा सांभाळ करणं, शेताला खत-पाणी देणे, बैलांच्या साहाय्याने शेत नांगरणे इत्यादी कामे करणं मच्छिंद्र दिघे सर यांना भाग पडलं.

महाविद्यालयीन शिक्षण:

विज्ञानाचा प्रचंड ध्यास उराशी बाळगत एफ. वाय. बी. एस्सी. ते टी. वाय. बी. एस्सी. चे म्हणजेच पदवीपर्यंतचे शिक्षण मच्छिंद्र दिघे सर यांनी संगमनेर महाविद्यालय, संगमनेर येथे पूर्ण केले. तसेच मच्छिंद्र दिघे सर यांनी कोपरगाव येथील एस.एस.जी.एम. कॉलेज येथे पदव्यूत्तर पदवी  (एम. एस्सी.) चे शिक्षण पूर्ण केले.

पहिली नोकरी:

सन 1990 मध्ये  पारनेर तालुक्यातील निघोज येथील मुलीकादेवी ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक म्हणून मच्छिंद्र दिघे सर रुजू झाले आणि आपल्या शिक्षण सेवेचा शुभारंभ केला आणिन्यूटन,आईनस्टाईन, केप्लर , मॅक्स्वेल, हायगेन्स, जगदीशचंद्र बोस, सी.व्ही. रामन, इत्यादीवैज्ञानिकांनी मांडलेल्या विश्वात रमबाण झाले.

अणुरेणूंची अगाध दुनिया, दृष्टीच्या पार
सूक्ष्मजीव अदृश्य किरणही भवती फिरणार
या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे
बुद्धि मानवी स्थिरचर सारे विश्व वेधुनी उरे …

विवाह आणि कुटुंब:

               मच्छिंद्र दिघे सर यांचा शुभविवाह चिखली, ता. संगमनेर येथील एकनाथदादा सहाणे पाटील यांची कन्या सुनंदा यांच्याशी झाला. एम.कॉम.शिक्षण घेतलेल्या सुनंदाताईंनी सुरुवातीला अकाउंट विषयाचे मार्गदर्शन वर्ग घेण्यास सुरुवात केली आणि बघता बघता अनेक विद्यार्थी शंभर पैकी शंभर मार्क मिळवून अकाउंट विषयात बोर्डात प्रथम येऊ लागले. तसेच 2007 ते 2011 दरम्यान सक्सेस कम्प्युटर नावाचे कॉम्प्युटर सेंटर त्यांनी मालदाड रोड येथे सुरू करून अनेक विद्यार्थ्यांना टॅली कोर्स अध्यापन सुरू केले. संगमनेर मधील संग्राम पतसंस्थेचे संचालक पदी सलग तीन वेळा सुनंदाताईंची निवड झाली. 2016 साली संगमनेर नगर परिषदेमध्ये दुर्गाबाई तांबे यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध नगरसेविका होण्याचा बहुमान सुनंदाताईंना मिळाला. तसेच संगमनेर येथील फूड प्रोसेसिंग अँड एग्रीकल्चर प्रोडूस कंपनीमध्ये सुनंदाताई संचालक झाल्या. तसेच संग्राम पतसंस्थेच्या संचालिका सुनंदाताईंनी काम पाहिले. संगमनेर एमआयडीसी मध्ये फेब्रुवारी 2020 मध्ये एस. एम. इंडस्ट्रीज या पॅकेजिंग कंपनीची सुनंदाताईंनी स्थापना केली.असं म्हणतात की यशस्वी पुरुषामागे एका कणखर स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे एम.वाय. दिघे सरांच्या आयुष्यात सुनंदाताईंची मोलाची साथ मिळाली. 
               संसारा बरोबरच आपल्या मुलांच्या पंखांना बळ देण्याचा प्रयत्न दिघे सर यांनी केला. चिरंजीव मयूर याने बी. ई. आणि एल.एल.बी. चे शिक्षण पूर्ण केले असून तो सध्या प्रशासकीय सेवेतील परीक्षेचा अभ्यास करत आहे. दरम्यान आपल्या एस. एम. इंडस्ट्रीज या व्यवसायामध्ये देखील मयूर महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचबरोबर सरांची लाडकी सुकन्या स्नेहल तिने एम. टेक. केल्यानंतर अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून एम. एस. चे शिक्षण नुकतेच पूर्ण केले हा सध्या ती टेस्ला या इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनी मध्ये ग्लोबल सप्लाय मॅनेजमेंट या उच्च पदावर कार्य करत आहे. 

शिक्षक आणि उप प्राचार्य:

सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांनी सन 1991 मध्ये एम.वाय. दिघे सर यांची वडगाव पान येथील जनता ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून निवड केली.

सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कॉलेजमध्ये अठरा वर्ष सेवा केल्यानंतर एक ऑगस्ट 2020 रोजी सरांची उपप्राचार्य म्हणून निवड झाली. एक जानेवारी 2021 रोजी सर प्राचार्य म्हणून सह्याद्री ज्युनिअर कॉलेज, संगमनेर येथे रुजू झाले. या महाविद्यालयात एम. वाय. दिघे सर यांनी स्टेप ॲप द्वारे विज्ञान अभ्यास, जे.ई.ई., नीट आणि सीईटी साठी सुरू केलेली डायमंड बॅच, कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी टॅली बॅच, 11 वी साठी फाउंडेशन कोर्स, अभ्यास सहली, अभ्यास दौरे, विज्ञान प्रदर्शन अशा अनेक उपक्रमांना पाठबळ दिले.

संघटन कौशल्य:

2007 पासून आज पर्यंत एम.वाय. दिघे सर अहमदनगर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेमध्ये कार्यरत आहेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक, त्यांची मांडणी करताना तालुका अध्यक्ष ते राज्य पातळी वरील जनरल सेक्रेटरी पदापर्यंत सरांनी जबाबदारी आनंदाने पार पडली. महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, तसेच सध्याचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे साहेब यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून एम.वाय. दिघे सर यांच्याकडे पाहिले जाते.

सामाजिक पुरस्कार:

खरंतर बाजारात गेल्यावर “ओळखलंत का सर मला ?” हे वाक्य जर एखाद्याच्या कानी पडले तर तो व्यक्ती नक्कीच शिक्षक असतो. आपल्या कारकिर्दीत शेकडो विद्यार्थी घडविणाऱ्या एम.वाय. दिघे सर यांना संजीवनी शेती आणि शिक्षण प्रतिष्ठान तर्फे शिवछत्रपती पुरस्कार, मर्चंट बँकेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. महाराष्ट्र राज्यात एम.पी.एस.सी परीक्षेमध्ये पाचवा क्रमांक मिळविलेला शैलेश झावरे हा विद्यार्थी, निलेश देशमुख, सत्यजित निघुते, ताई गावडे यांसारखे अनेक डॉक्टर , अभियंते शिक्षक , तंत्रज्ञ एम.वाय. दिघे सर यांच्या मार्गदर्शनातून पुढे आले.

कोणतीही समस्या शांतपणे ऐकून घेऊन, वादाच्या विषयांमध्ये तत्वांशी तडजोड न करता समन्यायी भूमिका घेत त्यावर समतोल निर्णय देणे ही सरांची हातोटी. तसेच विद्यार्थ्यांबाबत आणि शिक्षकांबाबत मानवीय दृष्टिकोनातून बघण्याची कला एम.वाय. दिघे सर यांना इतर शिक्षकांपेक्षा वेगळं ठरविते. एखाद्या शिक्षकात असलेल्या चांगल्या गुणांना वाव देऊन त्यांसाठी तशी संधी निर्माण करून देण्याचं काम एम.वाय. दिघे सर यांनी केलं.

रिटायर होताना असलेला पगार अथवा त्यानंतरची पेन्शन यापेक्षा आपल्या कारकिर्दीत घडवलेले विद्यार्थी आणि समृद्ध केलेली अनेक आयुष्यं त्या शिक्षकाचे मोठेपण दर्शवितात. अशाच आभाळा एवढं कर्तुत्व असणाऱ्या, वटवृक्षासारखं मोठेपण असणाऱ्या आणि विद्यार्थीप्रिय आणि विज्ञाननिष्ठ सन्माननीय प्राचार्य प्राध्यापक एम.वाय. दिघे सर यांना सेवापूर्ती समारंभ निमित्त आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !

स्विकारुनी आव्हानांना, गंध यशाचा धुंद करावा
मिठीत घ्यावी आपुली स्वप्ने , आयुष्याचा उत्सव व्हावा !

शब्दांकन – माहिती संकलन : प्रा. नितीन रघुनाथ नवले , भौतिक शास्र विभाग,  भा. गुं. पा. सह्याद्री जुनियर कॉलेज, संगमनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here