युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – घातक असलेल्या नायलॉन मांजावर बंदी असूनही संगमनेर शहर व परिसरात अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री व वापर होत आहे. प्लॅस्टिक व काच मिस्त्रीत नायलॉन मांजामुळे पादचारी, दुचाकी वाहनचालक जखमी होण्याच्या घटना घडत आहेत तसेच प्राणी आणि पक्ष्यांचे जीव जात आहेत. त्यामुळे नायलॉन मांजाची विक्री करणार्यांवर आणि पतंग उडविण्यासाठी त्याचा वापर करण्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणीमित्र संघटनेने केली आहे.
सजीवांच्या जीवास घातक असणार्या नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातली आहे. परंतु एकमेकांची पतंग कापण्यासाठी काही उत्साही तरुणांकडून मांजाचा वापर केला जात आहे. या पतंगी झाडांच्या फांद्यात व इतरही ठिकाणी अडकतात. तसेच पतंग उडविताना या मांजामुळे पक्षी गंभीर जखमी होतात, त्यांचा मृत्यू होतो. संक्रांतीच्या आनंदी वातावरणात नागरीक जखमी होतात. तर कधी कधी हा मांजा एखाद्याच्या जीवावर बेतला जातो. त्यामुळे नायलॉन मांजाची विक्री व वापर करणार्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती करावी. अजूनही अनेक व्यापारी बाजारपेठेत मांजाची विक्री करतात. त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.