नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले
संगमनेर ( प्रतिनिधी ) संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची अत्यंत वर्दळ असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये अनेक जण जखमी होतात. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे अशी मागणी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अपघाता बाबत सरकारचे लक्ष वेधताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, नुकतीच शिर्डी येथून आळंदी वारीसाठी जात असलेल्या वारकऱ्यांच्या दिंडीला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणावीस मैल खंदरमाळ येथे नुकताच मोठा अपघात झाला असून यामध्ये चार वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दहा वारकरी जखमी झाले.
घारगाव संगमनेर दरम्यान डोळासने हे मध्यवर्ती सेंटर असून या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले असते. तर कदाचित त्या वारकऱ्यांचा जीव वाचला असता. अपघात झाल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी तातडीने या सर्वांना मदत केली. पुणे नाशिक महामार्गावर वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे यामुळे सातत्याने अपघातचे प्रमाणही वाढले आहे.
पुणे – नाशिक राष्ट्रीय महामार्गासह इतर गावांमधील जाणाऱ्या रोडवरही छोटे – मोठे अपघात होत असतात. हे अपघात झाल्यानंतर जखमींना आळेफाटा किंवा संगमनेर या ठिकाणी घेऊन जावे लागते. यामुळे खूप वेळ लागतो. म्हणून अपघातानंतर जखमींना तातडीने उपचार मिळावा याकरता डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे अनेकांचे जीव वाचतील व अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ उपचार मिळेल. त्याकरता तातडीने डोळासने येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करावे अशी आग्रही मागणी आमदार तांबे यांनी विधान परिषदेत केली असून सरकारचे याकडे लक्ष वेधले आहे.
आमदार तांबे यांनी केलेल्या या मागणीबद्दल पठार भागातील अनेक नागरिक व युवक कार्यकर्त्यांनी आमदार सत्यजित तांबे यांचे अभिनंदन केले आहे.