परिसरात खळबळ
बॅंकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
संगमनेर
तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लांबविली आहे. यापूर्वी देखील तळेगावमध्ये चोरट्यांनी एटीएम फोडले होते. पुन्हा एकदा घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.
माहितीनुसार तळेगाव गावातच इंडियन ओव्हरसीज बॅंकेची शाखा आहे. तसेच त्याच ठिकाणी एटीएम देखील आहे. दरम्यान रात्री अज्ञात चोरट्यांनी हे एटीएम मशीन गॅस कटरच्या साह्याने जाळून टाकत आतमधून या चोरट्यांनी चार लाख 84 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. सकाळी या बाबत माहिती मिळताच आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकाने नगरहून फिंगरप्रिंट व श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. संबंधित बँकेचे अधिकाऱ्यांनी या संदर्भात अधिक माहिती व फिर्याद दिल्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या एटीएम फोडीच्या घटनांनी बॅंकेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.