मृताची ओळख पटेना, तपास सूरू
संगमनेर ( प्रतिनिधी)
अज्ञात इसमाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळून ठार मारण्याची घटना तालुक्यातील रणखांबवाडी येथे शनिवारी दुपारी घडली आहे. याबाबत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, रणखांबवाडी येथील बाळासाहेब भागवत विघे हे आपल्या शेतामध्ये बांधीवर शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यांच्या शेतीचे बांधाशेजारी फॉरेस्टमध्ये एक पुरुष अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडलेला असल्याचे त्यांना दिसले. ही माहिती त्यांनी कामगार पोलीस पाटील यांना दिली. पोलीस
पाटलांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एक इसम मयत अवस्थेत व अर्धवट जळालेल्या अवस्थेत उताणे स्थितीत पडलेला होता. त्याचे अंगावर कपडे नव्हते. त्याचे डोक्याचे केस अर्धवट जळालेले होते, चेहरा, छातीवर कमरेवर भाजून जखमा झालेल्या होत्या. व नाकातून रक्त व पाणी येत होते. तसेच छातीवर भाजून कातडी निघालेली होती. त्याचे वय अंदाजे ३५ ते ४० असावे. सदर इसम हा अनोळखी होता.
सदर इसमास अज्ञात इसमांनी जीवे ठार करून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याचेवर काहीतरी ज्वलनशील पदार्थ
टाकून त्यास पेटवून दिल्याचे आढळून आले. सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर घटना ठिकाण व मयतास पाहून आजुबाजुची पाहणी केली. त्यानंतर पंचनामा करून सदर मृतदेह रुग्णवाहिकेतून सरकारी रुग्णालय संगमनेर येथे पाठविण्यात आला. याबाबत रणखांबवाडी येथील कामगार पोलीस पाटील साहेबराव बाबुराव बारवे यांनी घारगाव पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.