डास, मलेरियासह साथरोगाने नागरीक हैराण
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरालगत असणार्या व वाढते नागरीकरण होणार्या त्याच बरोबर आजूबाजूला रूग्णालय, शाळा असा परिसर असणार्या संगमनेर खुर्द येथील गोळीबार नगर परिसरात ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. उघडी गटारे, त्यातून उफळणारे दुषीत पाणी, कचर्याच्या कडेला कचर्याचे ढीग, रस्त्यावर साचलेले पाणी व चिखल, सर्वत्र पसरलेली दुर्गंधी यामुळे परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे मलेरिया, हिवताप व साथ रोगांचे आजार वाढत असून नागरीक त्रासले आहे. ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास ग्रामपंचायतील ताळे ठोकू असा इशारा येथील रहीवासी व शिवसेना, युवासेनेचे जिल्हा प्रमुख अमित चव्हाण यांनी दिला आहे.
शहरालगत असणारी व सातत्याने विस्तारत जाणार्या संगमनेर खुर्द ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठ-मोठे व्यावसायीक, शाळा, महाविद्यालये, उद्योगधंदे सुरू होत आहे. यातून ग्रामपंचायतीला मोठा महसूलही मिळत आहे. मात्र येथील स्थानिक नागरीकांना व या उद्योजक व व्यावसायीकांना कोणत्याही सुविधा ग्रामपंचायतीकडून वेळेवर पुरविल्या जात नाही. येथील गोळीबार नगर परिसरातील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषत: या परिसरातील स्वच्छतेकडे व नागरीकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे मोठे दुर्लक्ष जाले आहे. रस्त्यावर उघड्या गटारीचे पाणी वाहत आहे. कचरा उघड्यावर पडलेला असून मोकाट जनावरे भटकंती करीत आहे. दुर्गंधी व डासामुळे या रस्त्याने पायी चालणे अवघड होऊन बसले आहे. याच परिसरात एक मोठे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, इंग्लिशमिडीयम स्कूल असून अनेक दुकानदार आपले व्यावसाय करत आहे. मात्र आजूबाजूच्या परिसरात पसरलेल्या कचर्यामुळे, दुर्गंधीमुळे ग्राहक या ठिकाणी येण्याचे टाळत आहे. त्याचा मोठा फटका या व्यावसायीकांना बसत आहे. ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही या ठिकाणी स्वच्छता राखली जात नाही. नुकतेच देशभर स्वच्छता अभियान पार पडले. मात्र या ठिकाणी अस्वच्छताच राहिली.
अस्वच्छता, दुर्गंधी, ढासाळलेले आरोग्य यामुळे येथील नागरीकांनी ग्रामपंचायतीविरूद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अमित चव्हाण, बाबुराव मांडेकर, सचिन भालेराव, स्वप्निल जोर्वेकर, योगेश जोर्वेकर, विकास साबळे, सोमनाथ गायकवाड, विशाल पराड, भोलेश्वर गिरी यांच्यासह ग्रामस्थांनी दिला.