
भाजपचा पाठिंबा सत्यजित तांबे यांना मिळण्याचा मार्ग मोकळा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अपक्ष उमेदवार म्हणून मैदानावर उतरल्यानंतर काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केल्यानंतर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी संगमनेरात देवदर्शन करून प्रचाराचा नारळ फोडला आहे. महाआघाडीने जरी शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला असला तरी महाआघाडीचा घटक असलेल्या काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र सत्यजित तांबे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून सत्यजित तांबे यांनी पाठिंब्याबाबत सर्व पक्षांना आवाहन केले होते. मात्र महाआघाडीने पाठिंबा देण्यास नकार दिला शिवाय त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. तर भाजपाने अद्यापपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नसली तरी भाजपचा पाठिंबा सत्यजित तांबे यांना मिळण्याचा मार्ग मात्र आता मोकळा झाला आहे. दरम्यान कोणी काय भुमिका घेतली किंवा घेणार याकडे लक्ष न देता सत्यजित तांबे यांनी आज तालुक्यातील खांडेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच सय्यद बाबा दर्ग्यावर चादर चढवून प्रचाराला सुरवात केली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, डॉ. सुधीर तांबे यांनी आपल्या तीन टर्ममध्ये शिक्षक, पदवीधर यांच्या प्रश्नांवर विधानपरिषदेत आवाज उठवत अनेक प्रश्न मार्गी लावले. सोबतच त्यांनी पक्षविरहीत अनेक माणसे जोडली. पाचही जिल्ह्यात त्यांनी आपल्या कामातून नेतृत्व सिद्ध केले. तोच वारसा आज आपण पुढे घेऊन जात आहोत. आज पक्ष सोबत नसला तरी अनेक तरुण, वेगवेगळ्या विचारधारेचे कार्यकर्ते माझ्या सोबत उभे राहिले आहे. एक तरुण नेतृत्व नक्कीच पदवीधरांच्या प्रश्नासाठी काम करेल असा विश्वास त्यांना वाटत असल्याने पक्षीय राजकारणा पलीकडे आपल्याला पाठिंबा देत आहे. हीच आपली जमेची बाजू आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान आपल्या परिवाराला आज आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जात असले तरी लवकरच याबाबत आपण आपली भुमिका व मत जाहीर करू असे सांगत आपल्याला साथ देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांच्या सोबत यावेळी अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी होते.
