संगमनेर रोटरीने तिरळेपणामुक्त जिल्ह्याचा सोडला संकल्प

0
1875
तिरळेपणा निर्मुलन शस्त्रक्रिया संपन्न


एका दिवसात ५६ जणांवर मोफत तिरळेपणा निर्मुलन शस्त्रक्रिया संपन्न
संगमनेर (प्रतिनिधी) – येथील रोटरी क्लब संगमनेर, रोटरी आय केअर ट्रस्ट व पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तिरळेपणा निर्मुलन शिबीर येण्यात आले. शुक्रवार दि. ६ ते रविवार दि. ८ जानेवारी पर्यंत हे शिबीर आयोजित केले गेले. या शिबीरामध्ये २६४ रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली, त्यामधुन ५६ रुग्णांच्या ९७ डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली अशी माहिती रोटरी आय केअर ट्रस्टचे अध्यक्ष सीए संजय राठी यांनी दिली.पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मधुसुदन झंवर यांच्या टीमने या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. या टीममध्ये महाराष्ट्रातून या शस्त्रक्रियांसाठी नावाजलेले २२ तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश होता. दि. ६ जानेवारी रोजी सर्व रुग्णांची तपासणी करण्यात आली व दि. ७ जानेवारी रोजी निवडलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पडली. या सर्व रुग्णांना दि. ८ रोजी घरी सोडण्यात आले.


संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी राहुल वाघ यांचे हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी या शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजकांचे आभार मानले. यावेळी आलेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची चोख व्यवस्था करण्यात आली होती. तिनही दिवसांचा अल्पोपहार, दुपारचे व संध्याकाळचे जेवण तसेच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.संगमनेर येथील प्रसिद्ध उद्योजक श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले यांच्या हस्ते शिबीराचा समारोप करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या, अतिशय निस्वार्थपणे मोफत सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांचे आभार मानले, तसेच रोटरी क्लब करत असलेल्या कामाचे कौतुक केले. रोटरीच्या कार्यास दानशूर संगमनेरकर निश्चितच मदत करतील, पुढील वर्षापर्यंत रोटरी क्लबने अहमदनगर जिल्हा तिरळेपणामुक्त करावा त्यासाठी सर्वोतोपरी मदत आम्ही करु असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी उपप्रांतपाल गौरव भुजबळ, पुणे येथील डॉ. मधुसुदन झंवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


याप्रसंगी शिबीरीमध्ये सहभागी झालेल्या सर्व डॉक्टरांचा सन्मान रोटरीतर्फे करण्यात आला. प्रकल्प यशस्वीततेसाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष हृषिकेश मोंढे, प्रकल्प प्रमुख दिलीप मालपाणी, अजित काकडे, महेश वाकचौरे, रोटरी आय केअरचे सचिव संजय लाहोटी, सर्व रोटरी क्लब सदस्य व रोटरी आय केअर स्टाफ यांनी मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजित काकडे यांनी केले तर अभार प्रदर्शन रोटरी क्लबचे सचिव आनंद हासे यांनी केले. यावेळी सर्व पदाधिकारी व रोटरी क्लब सदस्य मोठ्या संख्येनें उपस्थित होते.

पत्रकार बंधुंचा सन्मान
शिबीराच्या शुभारंभ दिनी ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार बंधू रोटरी क्लबच्या प्रचार प्रसारासाठी करीत असलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून संगमनेर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व पत्रकार बंधूंनी रोटरी क्लब व रोटरी आय केअरच्या कामाची माहिती घेतली व करत असलेल्या कामाबद्दल कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here