सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर; वारंवार चोऱ्यांमुळे उद्योजक हतबल
संगमनेर : (युवावार्ता प्रतिनिधी)
संगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये अज्ञात चोरट्याने एका ट्रान्सफॉर्मर कंपनीत घुसून १ लाख ७ हजार रुपये किमतीच्या कॉपर वायर अॅल्युमिनियम वायरच्या बंडलची चोरी केली. ही घटना रविवारी रात्री घडली. वारंवार या औद्योगिक वसाहतीत अज्ञात चोरटे किमती माल चोरून नेत असल्याने येथील उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये प्रथमेश ट्रांसफार्मर्स नावाची रोहित्र बनविण्याची कंपनी आहे. रविवारी रात्री अज्ञात चोरट्याने या कंपनीच्या गेटवरून उडी मारून आत प्रवेश केला. या चोरट्याने कंपनीमधील ७६ हजार १०० रुपये किमतीचे कॉपर वायर बंडल व ३० हजार ९७६ रुपये किमतीचे अॅल्युमिनियम वायर बंडल चोरून नेले. आपल्या कंपनीमधून वायर बंडलची चोरी झाली असल्याचे उद्योजक विश्वजीत वसंतराव कुलकर्णी यांच्या काल सोमवारी सकाळी लक्षात आले. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
त्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. दरम्यान या औद्योगिक वसाहतीत इतर समस्यांसोबतच चोरट्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. पोलीस विभागाकडून केवळ सुरक्षेच्या हमीचे आश्वासन दिले जाते कृती मात्र केली जात नसल्याने येथील उद्योजकांमध्ये प्रचंड संताप आहे. दररोज रात्री संगमनेर औद्योगिक वसाहतीमध्ये पोलिस केवळ चक्कर मारतात. त्यांच्या जाण्यानंतर मात्र चोरांना रान मोकळे होते.
याआधीही विजया अॅग्रो, प्रथमेश ट्रान्सफॉर्मर्स, श्रध्दा प्लॅस्टिक, व्ही आर ट्रान्सफॉर्मर्स या कंपन्यांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत. या चोऱ्यांचा तपासही अजून लागलेला नाही.
संगमनेर औद्योगिक वसाहतीच्या वतीने पोलिसांना चौकी देण्यास आम्ही तयार आहोत असे सांगितल्यानंतरही त्यावर पुढे काही कार्यवाही झाली नाही.
कोव्हिड, नैसर्गिक आपत्ती, वीजेचा प्रश्न आदींनी या औद्योगिक वसाहतीतील उद्योजक बेजार झालेले आहेत. त्यातच अशा चोऱ्यांमुळे उद्योजक हतबल झाले आहेत. संगमनेर पोलिस प्रशासनाने योग्य ती पावले उचलून संगमनेर औद्योगिक वसाहतीला संरक्षण दिले पाहिजे.