मुलगा गंभीर जखमी, चालकाच्या बेजबाबदारपणामुळे संताप
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर नगरपालिकेच्या नेहरु गार्डन तेथील लहान मुलांची रेल्वे तथा चाचा नेहरु एक्सप्रेस रुळाहून घसरुन अपघात झाला. या अपघातात विराज मारुती शिंदे (रा. संजय गांधी नगर) हा बालक रेल्वेच्या डब्ब्याखाली सापडून गंभीर जखमी झाला. हा अपघात काल रविवारी झाला.
संगमनेर नगरपरिषदेने नेहरू उद्यानात लहान मुलांची रेल्वे सुरू केली व ती चालविण्याचा ठेका दुसर्या व्यक्तीला दिला. या रेल्वेसाठी प्रत्येक मुलांमागे पाच ते दहा रुपये घेतले जातात. दरम्यान अतिशय जिर्ण झालेली व खटारा रेल्वेतून लहान मुलांना या रेल्वे मार्गावरून फिरवले जातात.
दरम्यान काल रविवार असल्याने नेहरू उद्यानात मुले महिलांची मोठी गर्दी होती. त्यामुळे ही रेल्वे देखील गर्दीने ओहरफ्लो धावत होती. दरम्यान ही चाचा नेहरू एक्सप्रेस रुळाहून घसरुन मोठा अपघात घडला. मात्र अपघात घडल्यानंतर रेल्वे चालकाने जखमी मुलांना तत्काळ रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असताना रेल्वे चालक मात्र तेथून पसार झाला. याबाबत सविस्तर माहिती अशी. की, रविवार दि. 10 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास विराज मारुती शिंदे हा बालक नेहरु गार्डन येथे खेळण्यासाठी गेला होता. रविवार असल्यामुळे तेथे खेळण्यासाठी मुलांनी एकच गर्दी केली होती.
रेल्वे सुरू झाली आणि काही क्षणात तिचे इंजिन रुळाहून खाली घसरले. एकापाठोपाठ एक डब्बे रुळाखाली आले. यावेळी विराजने प्रसंगावधान राखून खाली उडी मारली. मात्र, बाजुला जाळी असल्यामुळे तो तेथे अडकला. त्याने उडी मारली त्याच्या पाठोपाठ एक डब्बा देखील त्याच्या अंगावर पडला. त्यामुळे, त्याला डोक्याला, तोंडाला, दाताला, पायाला मार लागला. पण, त्याचा एक बाजुचा हात पुर्णपणे सोलपटून निघाला. ही सर्व घटना घडताच गार्डनमध्ये एकच आरडाओरड झाली. यावेळी गाडीचे डब्बे उचलायचे आणि मुलांना बाहेर काढायचे तर रेल्वे चालक तेथून पळून गेला.
दरम्यान हा सर्व प्रकार शिवसेनेचे माजी शहरप्रमुखअमर कतारी यांनी सोशल मीडियातवर शेअर केल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यांनी तत्काळ मुलाच्या पालकांशी संपर्क केला आणि संबंधित मुलाचा खर्च आम्ही करु असे आश्वासन दिले. मात्र नगरपरिषदेने त्या बालकास एखाद्या खाजगी रुग्णालयात उपचार करावेत. मुलास दोन लाख रुपयांची भरपाई दिली पाहिजे. तसेच जो कोणी यात दोषी आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा आणि संबंधित जखमी मुलाच्या दवाखान्याचा खर्च करुन त्यास नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी नागरीकांनी केली आहे.
संगमनेर नगरपालिकेचे नेहरू उद्यान हे एकमेव मोठे उद्यान आहे. या उद्यानात शहरातील अनेक नागरीक, महिला, मुले खेळण्यासाठी, फिरण्यासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी या नागरीकांसाठी पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नाहित. तसेच मुलांसाठी पुरेशी सुरक्षा नाही. अनेक खेळण्याच्या साहित्याची तुटफुट झाली आहे. त्याकडे पलिकेने लक्ष देण्याची गरज आहे.