उपक्रमातील सातत्य मोलाचे – आ. बाळासाहेब थोरात
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – एखादा उपक्रम सातत्याने पंधरा वर्ष राबवणं आणि त्याद्वारे एकाहून एक सरस कार्यक्रमांचे आयोजन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. राजस्थान युवक मंडळ आणि मालपाणी उद्योग समूहाने याही पुढे जावून समाजासाठी नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. मंडळाने यावर्षी ‘संगमनेरचा राजा’ म्हणून संबोधल्या गेलेल्या श्रींच्या देखण्या मूर्तीचा आगमन सोहळा आयोजित करुन वेगळा पायंडाही घातला आहे. याशिवाय संगमनेर फेस्टिव्हलच्या मंचावर शहर व तालुक्यात देदीप्यमान यश मिळवणार्या कलाकार, खेळाडू व व्यक्तिंचा गौरव होणे ही अतिशय प्रेरणादायी बाब असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री, आ. बाळासाहेब थोरातांनी केले.
राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिव्हलच्या पंधराव्या वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी, उद्योजक बाळासाहेब देशमाने, संगमनेर मर्चन्ट्स बँकेचे अध्यक्ष संतोष करवा, शारदा पतसंस्थेचे अध्यक्ष राजेश लाहोटी, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, ओम जाजू, मंडळाचे कार्याध्यक्ष सम्राट भंडारी, उपाध्यक्ष सुदर्शन नावंदर, सचिव ओंकार इंदाणी, व्यंकटेश लाहोटी, रोहित मणियार आदी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करतांना फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी गेल्या पंधरा वर्षात संगमनेर फेस्टिव्हलच्या माध्यमातून शंभराहून अधिक दर्जेदार कार्यक्रमांचे सादरीकरण झाल्याचे सांगितले. गणेशोत्सवात पाच दिवस चालणार्या या सांस्कृतिक महोत्सवासाठी होणारा खर्च अफाट आहे. मात्र शहरातील उद्योजक, व्यापारी आणि संस्थांच्या माध्यमातून हे शिवधनुष्य पेलण्याची शक्ति प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. सार्वजनिक उत्सवाच्या माध्यमातून समाज एकवटला पाहिजे, त्यांचे प्रबोधन झाले पाहिजे असे लोकमान्य टिळकांना अभिप्रेत होते. त्यानुसार मंडळाने वेगवेगळे कार्यक्रम सादर केल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील स्वच्छतागृहांचा प्रश्न उपस्थित करतांना मालपाणी यांनी सद्यस्थिती विशद् केली. संगमनेरात ग्रामीणभागातून येणार्या नागरिकांचीसंख्या विचारात घेवून त्यांची कुचंबना रोखण्यासाठी आधुनिक पद्धतीच्या स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याची अपेक्षा व्यक्त करतांना त्यासाठी त्यांनी मालपाणी उद्योग समूहाद्वारा मदतीचा हातही पुढे केला. शुभारंभ प्रसंगी एकलव्य ढोल पथकाच्या सादरीकरणाने मालपाणी लॉन्सचा परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गेल्या वर्षभरात विविध माध्यमातून उत्तुंग कामगिरी करणार्या कलाकार, खेळाडू व व्यक्तिंचा सन्मानही केला गेला. त्यात इनव्हिल डिस्ट्रिक्ट 313 च्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल रचना मालपाणी यांचा तर राष्ट्रीय पातळीवरील योगासन स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करुन महाराष्ट्राचा दबदबा निर्माण करणार्या ध्रुव ग्लोबल स्कूलचे योगासनपटू, त्यांचे प्रशिक्षक व शाळेचे चेअरमन डॉ.संजय मालपाणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मातोश्री ललिता मालपाणी यांच्या 80 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजीमंत्री थोरात यांच्या हस्ते त्यांचे अभीष्टचिंतनही यावेळी करण्यात आले.
संगमनेर फेस्टिव्हलच्या शुभारंभाप्रसंगी सारंग मांडके आणि सारंग भोईरकर या दोघा संगणक अभियंत्यांच्या ‘गोष्ट इथे संपत नाही’ या शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयावरील अभिनव कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. शिवचरित्र हे अवकाशाएवढं विशाल, भव्य आणि अथांग आहे. त्याचा आवाका फार मोठा आहे. मात्र दुर्दैवाने आपण अफजल खानाचा वध, शायिस्तेखानाची बोटं आणि आग्रा येथून सुटका या पलीकडे बघायला तयार होत नाही. या दोघांनी मात्र त्याला छेद देत छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वगुणांचे वेगवेगळे पैलू उपस्थितांसमोर उलगडतांना क्षणाक्षणाला रोमांच निर्माण केला.