संगमनेर बस आगार एसटीचे की चोरांचे?

Sangamner Bus Stand


महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी लुटले 10 तोळ्यांचे दागिने
युवावार्ता (प्रतिनिधी
संगमनेर –
बसस्थानकात होणार्‍या चोर्‍या रोखण्यासाठी पोलीस चौकी उभारावी अशी मागणी वारंवार दैनिक युवावार्तासह प्रसार माध्यमांनी लावून धरली. त्यानंतर मोठा गाजावाजा करत बसस्थानकात पोलीस चौकी उभारली मात्र तेथे एकाही कर्मचार्‍याची नेमणूक न केल्याने ही चौकी फक्त शोभेची वस्तू बनली आहे. कारण की, पोलिसांच्या निष्क्रिय भूमिकेचा फटका सामान्य प्रवाशांना बसत असून या बसस्थानकात रोज चोरी, लुटमारीच्या घटना घडत आहेत. आपल्या लेकीसह राहुरीकडे निघालेल्या निवृत्त मुख्याधिपिकेच्या पर्सवर डल्ला मारीत चोरट्यांनी तब्बल साडेदहा तोळे वजनाच्या सोन्याच्या दागिन्यांसह 3 लाख 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल लांबविला आहे. या घटनेने शहर पोलिसांची उरली सुरली पत धुळीस मिळाली आहे. गेल्या सोमवारी घडलेल्या या घटनेची बुधवारी रात्री उशिराने नोंद करण्यात आली. आपली लक्तरे वेशीवर टांगली जावू नये म्हणून उशिरा नोंदीसह माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.


संगमनेर बसस्थानकातील या मोठ्या दरोड्याचा प्रकार मागील सोमवारी (ता.8) दुपारी दीड वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकातून राहुरीच्या दिशेने निघालेल्या ‘नाशिक-सोलापूर’ या बसमध्ये घडला. घुलेवाडी येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या परिसरात राहणार्‍या निवृत्त मुख्याध्यापिक रजनी सूर्यभान सहाणे (वय 63) या सोमवारी आपल्या भाचीच्या लग्नाला सोनई (ता.नेवासा) येथे जाण्यासाठी त्यांच्या मुलीसह आल्या होत्या. ‘नाशिक-सोलापूर’ या बसने त्या प्रवास करणार होत्या. मात्र या बसमध्ये चढणार्यांची मोठी गर्दी असल्याने धक्काधक्की सहन करत त्या दोघीही बसमध्ये चढल्या. सदरची बस शहराबाहेर ज्ञानमाता विद्यालयाजवळ आली असता बसच्या वाहकाने तिकिटाबाबत विचारणा केली असता सहाणे यांनी पैसे काढण्यासाठी आपली पर्स उघडली असता त्यात ठेवलेला दागिन्यांचा डबा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

या प्रकाराने बसमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. सर्व बॅग, पिशव्या तपासल्यानंतरही दागिन्यांचा डबा सापडत नसल्याने बसच्या वाहकाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे सांगितले मात्र सख्ख्या भाचीचे लग्न असल्याने त्याचा मुहूर्त टाळण्यापेक्षा लग्नकार्य उरकल्यानंतर याबाबत तक्रार देण्याचे त्या दोघींनी ठरविले व त्या राहुरीला गेल्या. दरम्यान बुधवारी (ता.10) रोजी त्या दोघीही लग्नकार्य उरकून संगमनेरला परतल्यानंतर रात्री उशिराने त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. त्यानूसार रजनी सहाणे यांच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे चार तोळ्यांचे गंठण, 90 हजार रुपये किंमतीचा तीन तोळे वजनाचा राणीहार, 60 हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी, 45 हजार रुपये किंमतीच्या दीड तोळे वजनाच्या दोन अंगठ्या आणि चारशे रुपये मूल्यांच्या दोन चांदीच्या अंगठ्या असा एकूण 3 लाख 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला.

संगमनेरात भव्य दिव्य बस आगार उभारण्यात आले. प्रवासी बस चालक, वाहक व कर्मचारी यांच्यासाठी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच सर्व मोठ्या शहरांना जोडणारे हे बस आगार असल्याने प्रवाश्यांची नेहमीच वर्दळ असते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनीही या बस आगाराला आपला अड्डा बनवला आहे. निष्क्रिय पोलीस यंत्रणा पाहून चोरटे रोज या ठिकाणी प्रवाश्यांची लुट करतात. आजपर्यंत या ठिकाणी अनेक अवैध प्रकार व लुटमारीच्या घटना घडल्या असल्याने हे बस आगार आहे की चोर भामट्यांचे आगार आहे असा प्रश्‍न पडला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख