पोलिस ठाण्याजवळच भेसळयुक्त खोबरे, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ !

संगमनेर
(युवावार्ता प्रतिनिधी)-
संगमनेर शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मानवी आरोग्याला घातक ठरेल असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाजारात विक्रीसाठी येणारे सुके खोबरे (वाट्या) चकाकी आणण्यासाठी चक्क साबणाच्या फेसयुक्त आणि अस्वच्छ पाण्याने धुवून वाळवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शहरातील मुख्य भागांत, जिथे पोलिसांची सतत वर्दळ असते, अशा परिसरात काही लोक जुने किंवा खराब झालेले खोबरे स्वच्छ करण्यासाठी साबणाच्या पाण्याचा वापर करत आहेत. प्राप्त छायाचित्रांमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एका टबमध्ये साबणाचे पाणी घेऊन त्यात खोबर्याच्या वाट्या टाकल्या जात आहेत. साबणामुळे या वाट्यांवरील घाण निघून त्यांना पांढरीशुभ्र चकाकी येते. त्यानंतर हे खोबरे उघड्यावर रस्त्याच्या कडेला वाळत घातले जाते.
खोबरे हे खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. साबणामध्ये असणारे कास्टिक सोडा आणि इतर रसायने खोबर्यात मुरल्यामुळे ते शरीरासाठी विषारी ठरू शकतात. असे खोबरे खाल्ल्याने पोटाचे विकार, विषबाधा किंवा दीर्घकाळ वापरामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ सुरू असतानाही अन्न व औषध प्रशासन किंवा स्थानिक नगरपालिकेचे याकडे लक्ष कसे गेले नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत. सणासुदीच्या काळात किंवा रोजच्या जेवणात वापरले जाणारे हे खोबरे थेट ग्राहकांच्या ताटात जात आहे.




















