चालक ठार, तीन मजूर बचावले
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – वाळूची बेकादेशीर वाहतूक करीत असताना पोलीसांना सुगावा लागला असता त्यांनी या पिकअपचा पाठलाग केला मात्र हा पाठलाग चुकवत असतांना आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने ही पिकअप खोल विहिरीत कोसळली. या दुर्घटनेमध्ये वाळू वाहतूक करणारे तीन मजूर बचावले मात्र वाहन चालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना काल मध्यरात्री तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक शिवारा आज शनिवारी पहाटे 4 ते 4.30 च्या सुमारास घडली.
वाळूने भरलेली पिकअप खाली करून येत असतांना पहाटे पोलीसांच्या पथकाने या पिकअपचा पाठलाग केला असता ही पिकअपवरील चालक या पोलीसांना चकवा देण्याच्या नादात वाहनावरील ताबा सुटल्याने एका शेतातील विहिरीत ही पिकअप कोसळली. दरम्यान विहिरीला खोल पाणी असल्याने ही पिकअप बाहेरून दिसेनाशी झाल्याने तपासासाठी गेलेले पोलीस हात हलवीत परत आले. त्यामुळे ही घटना लवकर समजू शकली नाही. मात्र पोलिसांनी केलेला पाठलाग चुकवण्याच्या नादात पिकअप शेतातील एका विहिरीत पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून पाणी असताना व नसताना देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा केला जातो. स्वस्त व कायदेशीर वाळू पुरविण्याचे आश्वासन देणार्या महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात व त्यांच्याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जातो. शासकीय डेपोतून सहाशे रुपयात कुणाला किती वाळू मिळते माहीत नाही परंतु आजही गरजू नागरिक रिक्षा, पिकअप मधून बेकायदेशीर वाळुतून आपली गरज भागवत आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बेकायदेशीर वाळू उपसा बाबत कठोर भूमिका केवळ नावापुरती असून गरजूंना वाळू पुरविण्यासाठी वाळू तस्कर रात्रीचा दिवस करत आहे.
दरम्यान काल रात्री धांदरफळ बुद्रूक परिसरातील प्रवरा नदी पात्रातून वाळू उपसा करून वाळूने भरलेली पिकअप ही धांदरफळच्या दिशेने खाली होऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरु केला. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे पिकअप चालक गोरख नाथा खेमनर (वय 23, राहणार डिग्रस, ता. संगमनेर) याच्या लक्षात आले. पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी त्याने भरधाव वेगाने वाहन चालवले. पुढे गेल्यानंतर त्याने आपले वाहन एका शेतात घातले. मध्यरात्री पिकअप चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. वाळूची रिकामी पिकअप थेट रस्त्यालगत असणार्या शेतातील एका खोल विहिरीत कोसळली. या वाहनांमध्ये चालकासह तीन मजूर बसलेले होते. या मजुरांनी दोरीच्या साह्याने विहिरीच्या बाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र पिकअप चालक गोरख खेमनर हा पिकअपसह विहिरीमध्ये बुडाला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान याबाबत स्थानिक ग्रामस्थांना माहिती समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. काही ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. ही माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. ज्या विहिरीमध्ये पिकअप पडली आहे ती विहीर अतिशय खोल असून पूर्ण पाण्याने भरलेले आहे.
वाळूची रिकामी गाडी विहिरीच्या तळापर्यंत पोहोचल्याने पोलिसांना हे वाहन दिसू शकले नाही. यामुळे पोलिसांना हात हलवत परत जाण्याची वेळ आली. पोलीस सकाळी पुन्हा घटनास्थळी गेले. या ठिकाणी पोलिसांनी क्रेनला व काही पोहणार्या युवकांना पाचारण केले. विहिरीत पाणी भरपूर असल्याने पिकअप चालकाचा शोध घेतला जात आहे. मात्र या घटनेने जीवावर बेतणारी वाळू तस्करी पुन्हा एकदा समोर आली आहे.