संगमनेरच्या व्यापार्‍याला गिळतोय स्मार्ट ट्रेंड ?

व्यापार


स्वस्त खरेदीच्या नावाखाली ग्राहकांंचीही होतेय फसवणूक, अनेक तक्रारी – भाग-2
युवावार्ता (विशेष प्रतिनिधी)
संगमनेर –
मुळातच श्रमिक मजूर, रोजाने कामाला जाणारे कर्मचारी यांचे दरडोई उत्पन्न कमी होत असले तरी खर्च करण्याची मानसिकता मात्र वाढत चालली आहे. प्रत्येकाला ब्रँडेड वस्तुंची भुरळ पडली आहे. त्यातच भर पडत आहे क्रेडीट कार्ड, डेबीट कार्ड आणि ऑनलाईन बँकींगने करता येत असलेल्या खर्चाची. खिशात रोख रक्कम नसली तरी आपण कितीही महागाची वस्तू त्वरीत खरेदी करु शकतो असा विश्‍वास या पिढीमध्ये निर्माण झाला आहे.


मोठमोठ्या उद्योगांना राष्ट्रीयकृत बँका सुद्धा विविध प्रकारे मदत करतांना दिसत आहे. कुठलीही वस्तू घ्या त्यावर बँकेच्या क्रेडीट कार्डद्वारे खरेदी केल्यास भरघोस सुट दिली जाते. शिवाय 3 वर्षांपर्यंत हप्ते करुन दिले जातात त्यामुळे लाख दोन लाखांच्या वस्तु माणूस खिशात पैसे नसले तरीसुद्धा सहजपणे घेत आहे. ऑनलाईन खरेदीमध्येही हाच प्रकार सर्रासपणे पहायला मिळत आहे. परंतू नंतर क्रेडीट कार्डच्या हप्त्यांवर लक्ष दिले नाही तर हेच क्रेडीट कार्ड तुम्हाला कंगाल करुन टाकते. क्रेडीट कार्डचे हप्ते वेळेत चुकते झाले नाही तर त्यावर भरमसाठ व्याज लाऊन ते वसूल केले जाते. काही ग्राहकांना क्रेडीट कार्डचे दंड झालेला लक्षात येत नाही आणि वस्तुच्या दुपट्टीपेक्षाही जास्त रक्कम चुकती करावी लागते.
शहरातील व्यापार अशा पद्धतीने एकाच उद्योग समुहाच्या हातात गेल्यावर तालुक्यातील उत्पन्न राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपनीकडे जाणार. शहरातील चलन शहरामध्येच राहिल्याने शहराच्या विकासाला चालना मिळते. अशा कंपन्या संगमनेरमध्ये येऊन पाच वर्षांहून अधिक काळ झाला आहे, परंतु शहराच्या विकासासाठी, किंवा येथील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या कंपन्यांनी आतापर्यंत काही केल्याचे मात्र ऐकिवात नाही. उलट जे व्यापारी शहराच्या विकासात हातभार लावत आहेत, सामाजिक कामांमध्ये आपले उत्पन्नाचा काही वाटा देत आहेत त्यांच्या व्यवसायावर मात्र परिणाम झाला आहे. या मोठमोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी त्यांनाही तोट्यात जाऊन काही वस्तु विकाव्या लागत आहेत या गोष्टी मात्र सुन्न करणार्‍या आहेत.


मोठ्या दुकानांमध्ये खरेदीमध्ये मोठी सुट दिली जाते, यामध्ये विकले जाणारे उत्पादनांची संख्या सुद्धा जास्त असते, ग्राहकांना या ठिकाणी वस्तू वापरुन पाहता येते म्हणून त्यांचा कल अशा ठिकाणी जाऊन वस्तू खरेदी करण्यावर जास्त आहे. परंतू याच ब्रँडेड वस्तूंना जेव्हा कालांतराने अडचण येते अशावेळी ग्राहकांना येणारा अनुभव मात्र वेगळाच असल्याचे पहायला मिळत आहे. वस्तू बदलून देण्याऐवजी दुरुस्त करुन देऊ असे सांगितले जाते, बर्‍याच वेळा ती वस्तु बदलण्यासाठी ऑनलाईन कंप्लेंट करायला सांगतात, परंतू या कंप्लेंट करण्यासाठी फार त्रास होतो, बर्‍याच लोकांना ते जमतही नाही. अनेक वेळा माणूस या सर्व प्रकाराला कंटाळून ती वस्तू बदलून घेतच नाही. हा अनुभव बर्‍याच ग्राहकांचा आहे. या अशा वातावरणात काही ग्राहक मात्र काहीही झाले तरी आम्ही स्थानिक व्यापार्‍यांकडूनच माल विकत घेऊ, त्यासाठी काही रक्कम जास्त मोजावी लागली तरी चालेल पण ही रक्कम बाहेर जाऊ देणार नाही अशा प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. जर संगमनेरची बाजारपेठ टिकवायची असेल तर संगमनेरमधील व्यापार्‍याकडूनच वस्तू खरेदी करण्यासाठी प्राधान्य द्यावे लागेल. व्यापार्‍यांनीही स्पर्धेचा विचार करुन वस्तु योग्य दरात व अतिशय आपुलकीने ग्राहकाला कशी देता येईल याबाबत विचार करणे गरजेचे आहे. यावर लवकरच विचार करुन शहरातील सर्व व्यापार्‍यांनी एक होणे गरजेचे आहे, यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. जर व्यापारीच याबाबत मौन धारण करुन राहिले तर पुढील काळ हा सर्व व्यावसायिकांसाठी भयावह असेल हे नक्की.

व्यापारीदृष्ट्या अतिशय संवेदनशील विषयाकडे लक्ष दिल्याबद्दल संगमनेरमधील अनेक व्यापार्‍यांनी दैनिक युवावार्ताचे अभिनंदन केले. व्यापार्‍यांच्या प्रतिक्रिया अतिशय बोलक्या होत्या. मुळातच कुठलाही व्यावसायिक हा प्रचंड नफा कमवत आहे त्यामुळेच त्याने मोठे दुकान टाकले आहे, असा गैरसमज असलेले नागरिक समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र त्यासाठी घेतलेले कर्ज, दुकानांसाठी द्यावे लागणारे प्रचंड भाडे, जागांचे वाढते भाव या सर्व भांडवली गोष्टी जुळवता जुळवता व्यावसायिकाच्या नाकीनऊ येतात हे मात्र कोणाच्या लक्षात येत नाही. आज संगमनेरचे नागरिक आमच्यासोबत राहिले नाहीत तर येणारा काळ हा सर्वांसाठीच कठीण असेल अशाही प्रतिक्रिया काहींनी व्यक्त केल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख