महसूलकडून गंगामाई घाटावर वाळू तस्करांची धरपकड

वाळू तस्करांची धरपकड

रिक्षा, दुचाकी जप्त : वाळूसाठे केले नष्ट
युवावार्ता(प्रतिनिधी)
संगमनेर अवैध वाळू तस्करांनी शहराचे वैभव असणार्‍या गंगामाई घाटाला वाळू उपश्याचे केंद्र बनविले होते. अवैध व बेसूमार वाळू उपश्यामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होत होते. तसेच गंगामाई घाटाला मोठा धोका निर्माण झाला होता. याबाबत विविध तक्रारी महसूल विभागाला मिळाल्यानंतर आज प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे व तहसिलदार अमोल निकम यांच्या नेतृत्त्वाखाली महसूल पथकाने गंगामाई घाटावर धडक कारवाई करत वाळू तस्करांची धरपकड केली. यावेळी दोन रिक्षा, खबर्‍याची दुचाकी जप्त करण्यात आली तर वाळू तस्करांनी गोण्यांमध्ये केलेला वाळूसाठा या पथकाने नष्ट केला.


महसूल मंत्री व महसूल विभागाने अवैध गौण खनिजावर कठोर निर्बंध आणल्यानंतर ट्रॅक्टर, ढंपर, पिकअप, ट्रक, हायवा, जे.सी.बी. यातून होणारी अवैध वाहतूक व उपसा बंद करण्यात आला. मात्र या वाळू तस्करांनी, रिक्षा, कार, बैलगाडी, गाढव यांच्या माध्यमातून वाळू उपसा सुरुच ठेवला. त्यातही या वाळू तस्करांनी गंगामाई घाटाला वाळू उपश्याचे केंद्र बनविल्याने अनेक दिवसांपासून पर्यावरण प्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात होता. वाळू वाहतूक सोपी व्हावी म्हणून हे तस्कर गंगामाई घाटाच्या पायर्‍यांलगत वाळू उपसा करत होते. त्यामुळे येथील पायर्‍या खचत चालल्या होत्या. तसेच मोठमोठे खड्डे पडलेे होते. पोहणार्‍यांसाठी हे खड्डे मृत्यूचे सापळे बनले आहे.


येथील वाळू उपशावर निर्बंध लावावे अशी मागणी वारंवार महसूल व पोलीस विभागाकडे केली जात होती. अनेकवेळा याठिकाणी कारवाईही करण्यात आली मात्र तरीही अवैध वाळू उपसा येथे सुरुच होता. दरम्यान आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान तहसिलदार अमोल निकम यांना गंगामाई घाट व नदीच्या दुसर्‍या तिरावर संगमनेर खुर्द येथे रिक्षातून अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार तळेकर, तलाठी तोरणे आप्पा, संग्राम देशमुख, अमोल गडाख, सौ. सांगळे, श्री. कुंदेकर यांच्या पथक तयार करुन घटनास्थळी रवाना केले. यावेळी या तस्करांचा खबरी या पथकाला पाहून आपली दूचाकी गाडी सोडून पळून गेला. ही गाडी ताब्यात घेत या पथकाने थेट नदीच्या दोन्ही बाजूंनी कारवाई सुरु केली. यावेळी दोन रिक्षा वाळू भरताना आढळून आल्या. तसेच नदीकाठी गोण्यांमध्ये भरलेला वाळूचा साठाही आढळून आला. मात्र या पथकाला पाहून सर्व वाळू तस्कर पळून गेले. या महसूल पथकाने या वाळूच्या गोण्या पेटवून देत वाळूसाठा नष्ट केला. तसेच दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या.


महसूल विभागाने या अगोदरही वाळू तस्करांच्या अनेक रिक्षा जप्त करुन तस्करांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच मागील दोन दिवसात तीन वाळू तस्करांना हद्दपार करण्यात आले आहे. अनेकांवर गुन्हे दाखल असून जप्त करण्यात आलेल्या रिक्षा लवकरच स्क्रॅप करुन त्याचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख