गुन्हा दाखल
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला संगमनेर तालुक्यात गोवंश जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शनिवारी (ता.20) दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास पिकअपमधून कत्तलीसाठी आणलेली 31 वासरे व एक गाईची उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने सुटका केली आहे.
आज सोमवारी संपूर्ण देशात आयोध्येतील श्रीराम मृर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा होत असतांना देशात कुठेच पशुहत्या व गोवंशहत्या होऊ नये अशा स्वरूपाचे वातावरण असताना देखील याला संगमनेर अपवाद दिसत असल्याचेच पाहायला मिळत आहे. शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना समजले की, कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथून एका पिकअप वाहनात गोवंश जनावरे कत्तलीसाठी संगमनेरच्या दिशेने येत आहेत.
त्यानुसार त्यांनी पथकातील पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल कडलग व पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दिघे परिसरातील संस्कृती मंगल कार्यालय येथे सापळा लावून एक संशयित पिकअप (एमएच.12, एफडी. 2456) वाहन पकडले. त्याची तपासणी केली असता त्यात निर्दयतेने 31 गोवंश वासरे व एक गाय कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे आढळून आले.
याप्रकरणी पोलीस नाईक राहुल डोके यांनी संगमनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप चालक रिहान अल्ताफ शेख (वय 19, तीनबत्ती चौक, संगमनेर) याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 2 लाख 50 हजार रुपयांची पिकअप, 62 हजार रुपये किमतीची 31 वासरे आणि 15 हजार रुपये किमतीची गाय असा एकूण 3 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान संगमनेर शहरातील कत्तलखाने सुरूच आहेत, असंच या घटनेवरून सिद्ध होत आहे.