उत्कर्षा रुपवतेंसह अनेक इच्छुक
शिर्डी मतदार संघ हा काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार संघ आहे. याठिकाणी पक्षाची विचारधारा व संघटन मजबूत आहे. ज्येष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांचे खंबीर नेतृत्व तसेच दोन विधानसभा मतदार संघ काँग्रेसकडे असल्याने काँग्रेसला निश्चित विजयाची मोठी संधी आहे. त्यामुळे पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांची भावना असल्याने महाआघाडीत हा मतदारसंघावर काँग्रेसने आपला दावा कायम ठेवला आहे.
उत्कर्षा रुपवते, युवा नेत्या काँग्रेस पक्ष
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा जल्लोष ओसरताच सर्वांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागणार आहे. यातही राजकीयदृष्ट्या नेहमी चर्चेत राहिलेल्या शिर्डी मतदारसंघाकडे सर्वांच्याच नजरा असतात. एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाकडे मागील काळात दुर्लक्ष झाल्यानंतर पक्षाने पुन्हा एकदा या मतदारसंघाकडे लक्ष देत आपला दावा सांगितला आहे. पक्षाकडून यावेळी तरुण, अभ्यासू व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व चळवळीतील कार्यकर्त्या उत्कर्षा रुपवतेंसह राजू वाघमारे, गणेश जाधव यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत. तर शिवसेना (ठाकरे) गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे, शिंदे गटाकडून सदाशिव लोखंडे, राष्ट्रवादीकडून बाळासाहेब गायकवाड, तर भाजपडून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील या मतदारसंघातून उमेदवारी मागीतली आहे. त्यामुळे सर्वांच्याच नजरा शिर्डीकडे लागल्या आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर व आघाड्यांच्या घोळात काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी या मतदारसंघावर भाजप- शिवसेनेने कब्जा मिळवला. परंतु आता बदललेल्या सर्व राजकीय समिकरणामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेने या जागेवर विजय मिळवल्याने महाआघाडीत या मतदारसंघावर शिवसेना (ठाकरे) गटाने दावा सांगितला असला तरी काँग्रेसने आपलाही दावा कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्या राज्य महिला आयोगाच्या सदस्या असलेल्या व काँग्रेस पक्षाच्या युवा कार्यकर्त्या उत्कर्षा रुपवते यांचे नाव प्रामुख्याने चर्चेत आले आहे. उत्कर्षा रुपवते यांचे आजोबा स्व. दादासाहेब रूपवते हे काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ नेते राहिले होते. सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते तर दुसरे अजोबा स्व. मधुकरराव चौधरी हे देखील मंत्री व विधानसभा अध्यक्ष राहिले होते. त्यांचे मामा देखील आमदार होते. रुपवते व चौधरी या दोन्ही परिवाराचे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. तसेच त्यांचे वडील स्व. प्रेमानंद रुपवते यांचे देखील मोठे काम होते. त्यांचाच वारसा आज उत्कर्षा रुपवते पुढे चालवत आहेत. स्व. प्रेमानंद रुपवते यांनी याच मतदारसंघातून उमेदवारी केली होती. परंतु त्यांना अपयश आले होते. आज ज्या पद्धतीने उत्कर्षा रुपवते या एक युवा कार्यकर्त्या म्हणून पक्षात काम करत आहेत त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी त्यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे.
दुसरीकडे शिवसेनेकडून (शिंदे गट) विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे हेच उमेदवारीचे दावेदार असतील असे दिसते. तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेतून काँग्रेस व काँग्रसमधून भाजप व पुन्हा शिवसेना ठाकरे गटात आल्याने सध्यातरी ठाकरे गटाकडून वाकचौरे यांचेच नाव समोर येत आहे. मात्र आतापर्यंत ठाकरे गटाने आयत्यावेळी उमेदवार निश्चित केल्याने वाकचौरे यांच्यावर पडलेला पक्ष बदलण्याचा शिक्का यामुळे पुढे वाकचौरे की आणखी नवीन कोण आयात करणार हे पाहणे महत्वाचे आहे. तसेच वेळ आल्यास ठाकरे गटाकडून वाकचौरेंना पर्याय म्हणून देखील उत्कर्षा रुपवते यांच्याकडे पाहिले जात आहे.
पुर्वीचा कोपरगाव मतदारसंघ व आत्ताचा शिर्डी लोकसभा मतदारसंघ 2009 पर्यंत खुला होता. 2009 च्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अनुसूचितजाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने येथील राजकीय समीकरणे बदलली आहे. आरक्षणामुळे भल्याभल्यांनी हा मतदारसंघ परका करून टाकलाय का ? असा प्रश्न चिन्ह निर्माण होतो. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रामदास आठवले यांनी निवडणूक लढवली तर शिवसेनेचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी बाजी मारली होती. 2014 साली वाकचौरे यांनी सेनेला रामराम ठोकत काँग्रेसचा रस्ता धरला आणि पुढची संधी कर्जत जामखेड चे माजी आमदार सदाशिव लोखंडे यांना मिळाली. आणि लोखंडे 13 दिवसात खासदारही झाले. याचवेळी 2014 साली काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रेमानंद रुपवते हे मतदारसंघात उभे राहिले परंतु मोदी लाटेमध्ये त्यांचा पराभव झाला आणि खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा लॉटरी लागली. परंतु आता राजकीय समीकरणे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बदलली असून हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडे खेचून आणण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, व कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच काँग्रेस पक्षाने येथील आपला दावा कायम ठेवला आहे.