हजारोंच्या उपस्थितीत सेवापूर्ती, ऋणनिर्देशन व पुस्तक प्रकाशन सोहळा
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मा. रू. दा. मालपाणी विद्यालयात 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापिका रंजना रखमा रहाणे यांचा सेवापूर्ती, ऋणनिर्देश व पुस्तक प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. मुख्याध्यापिका रंजना रहाणे या शिक्षणक्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्त्व असून त्यांची उणीव आम्हाला नक्की भासेल असे मत शारदा शिक्षण संस्था आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णाकाकी मालपाणी यांनी मांडले.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संगमनेर नगरपालिकेच्या मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, गट शिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविक इंजि. रूपेश रहाणे यांनी केले. अतिथींचा परिचय इंजि. नितीन पवार यांनी केला. प्रमुख अतिथींचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला. रंजना रहाणे यांच्या जीवनावर आधारित जीवनपट यावेळी दाखविण्यात आला. वसंत बंदावणे यांनी या जीवनपटाची निर्मिती केली.
रहाणे कुटुंबातील सदस्य अप्पासाहेब रहाणे यांनी अडचणीच्या काळात खंबीर राहून कुटुंब आणि नोकरीची जबाबदारी कशी पार पाडली याचा आढावा आपल्या मनोगतात घेतला.
शांता अशोक आहेर यांनी आपल्या मनोगतात रहाणे सरांच्या निधनानंतर खचून न जाता मुलांची काळजी, शिक्षणाचा वसा आणि कौटुंबिक जबाबदार्या कशा पार पाडल्या हे सांगितले. यावेळी सर्व उपिस्थतांना भावना अनावर झाल्या नाही. स्व. रहाणे सरांचे सहकारी सिनेट सदस्य हिरालाल पगडाल यांनी सरांच्या सिध्दार्थ हायस्कूलमधील नोकरी आणि आजारपणाच्या आठवणींना उजाळा दिला. थोरात कारखान्याचे संचालक आणि रहाणे परिवाराचे व्याही रोहिदास पवार यांनी रहाणे मॅडम यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक केले. मा. नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांना रंजना रहाणे यांनी चैतन्यनगरमधील वास्तव्यातील घराचे बांधकाम, चिरंजीव रूपेश, मुलगी डॉ. सोनाली यांचे शिक्षण आणि लग्न कशाप्रकारे केले याचे कौतुक केले.
यानंतर रूपेश रहाणे, रहाणे कुटुंबीय, सुदीप हासे यांनी संपादित केलेल्या ध्यासपर्व-एका जिद्दीचा खडतर प्रवास या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पुस्तकाचा प्रवास कसा झाला, त्याला कोणाची साथ लाभली याचा आढावा सुदीप हासे यांनी घेतला. संपूर्ण रहाणे आणि कोताडे परिवाराच्या वतीने रंजना रहाणे यांचा कौटुंबिक सत्कार करण्यात आला.
यानंतर मा. शिक्षण विस्तार अधिकारी डी.डी. वाकचौरे, मालपाणी विद्यालयातील सह शिक्षक उत्तम एरंडे, सह शिक्षक प्रज्ञा डांगे यांनी रहाणे मॅडमच्या कार्यकाळातील त्यांचे विविधअंगी व्यक्तीमत्व, शिस्त, दरारा, सेवाभाव, विद्यार्थ्यांविषयीचा जिव्हाळा याविषयी सविस्तर मनोगते मांडली. छोट्या विद्यार्थी प्रतिनिधी कु. जान्हवी घुले, कु. वैभवी आरसिद्ध यांनी मुख्याध्यापिका रंजना रहाणे यांच्याविषयी केलेले भाषण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
प्रमुख पाहुण्या सुवर्णा फटांगरे यांनी मुख्याध्यापिका आणि शिक्षिका म्हणून रहाणे मॅडम अव्वल होत्या असे आपल्या भाषणात सांगितले. दुर्गाताई तांबे यांनी कार्यक्रमाच्या तयारीचे कौतुक केले. संपूर्ण परिवारासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी केलेले काम किती समर्पक असेल याची खात्री हजारोंच्या गर्दीतूनच दिसत आहे असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुवर्णाकाकी मालपाणी यांनी रहाणे मॅडम यांच्या 34 वर्षांच्या सेवेतील आठवणींना उजाळा दिला. स्व. ओंकारनाथ मालपाणी यांनी 34 वर्षांपूर्वी जो विश्वास श्रीमती रहाणे यांच्यावर ठेवला त्याला त्या पात्र ठरल्या आहेत असे मला वाटते. विद्यार्थी, सहशिक्षक यांना कसे सांभाळायचे. स्वयंशिस्त आणि समर्पणाचे उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती रहाणे आहेत असे गौरवोद्गार सुवर्णाताई मालपाणी यांनी यावेळी काढले. यानंतर प्रज्वल रहाणे यांनी श्रीमती रहाणे यांच्या जीवनावर आधारित बनविलेल्या चित्रफितीचे प्रसारण करण्यात आले.
सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने परिवाराकडून जि. प. प्राथमिक शाळा, चंदनापुरी, जि.प.प्राथ. शाळा, सडे यांनी विकास निधी देण्यात आला. अनोख्या उपक्रमांतर्गत सत्कार महणून पुष्पगुच्छांऐवजी वह्या स्विकारण्यात आल्या. या वह्या वरील विद्यालयातील गरजू विद्यार्थांना देण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते लहानभाऊ गुंजाळ, थोरात कारखान्याचे माजी अध्यक्ष आर. बी. रहाणे, राजहंसचे माजी उपाध्यक्ष सुभाष आहेर, युवावार्ताचे संपादक किसन भाऊ हासे, शिक्षण प्रसारकचे अनिल कढणे, सह्याद्री संस्थेचे रजिष्ट्रार बाबुराव गवांदे आदी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक तसेच परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार डॉ. सोनाली पवार रहाणे यांनी मानले.