पारेगावचा ‘रजनीकांत’ साकारतोय ‘द बाप कंपनी’ ; रावसाहेब घुगे यांनी संगमनेरच्या ग्रामिण भागात उघडली आय.टी.ची कवाडे

0
2398
The Baap Company

संगमनेर – पारेगावचा रजनीकांत वाचल्यावर सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला असेल पण वास्तवात आश्‍चर्यच वाटावे असे काम पारेगाव खुर्द येथील 37 वर्षांचे आय.टी. प्रोफेशनल रावसाहेब घुगे यांनी सत्यात उतरविले आहे. दाक्षिणात्य अभिनेता रजनीकांत शिवाजी द बॉस या फिल्ममध्ये जसा परदेशात राहूनही भारतात आय.टी. कंपनी, मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचा प्रयत्न करतो तसाच प्रयत्न संगमनेरमधील तरूण अभियंता रावसाहेब घुगे यांनी केला आहे. अमेरिकेमध्ये लाखोंचे असेलेले पॅकेज झुगारून गावातल्या मातीत परत येण्याचा चंग त्यांनी बांधला. ग्रामिण भागातील तरूण विद्यार्थ्यांना आय.टी. मधील शिक्षण मिळाले पाहिजे. जे वंचित आहेत, ज्या हातांना दिवसा गुरे चारण्याची आणि संध्याकाळी चारा काढण्याशिवाय पर्याय नाही त्या हातांना लॅपटॉप आणि प्रोग्रामिंग शिकविण्यासाठी रावसाहेब घुगे यांनी पुढाकार घेवून पारेगाव खुर्द येथे साकारली आहे ‘द बाप कंपनी’. बाप म्हणजे बिझनेस अ‍ॅप्लिकेशन अँड प्लॅटफॉर्म.

Raosaheb Ghuge

पारेगाव खुर्द सारख्या ग्रामिण भागात शिक्षण घेतलेल्या रावसाहेब घुगे हे जेव्हा शहरी भागात माध्यमिक शिक्षणासाठी संगमनेरला आले तेव्हा शहरी भागातील विद्यार्थ्यांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. संगमनेरमधून मुंबईला महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेल्यानंतरही काहीसा असाच अनुभव त्यांना आला. 2007 साली मास्टर इन कॉम्प्युटर सायन्स पूर्ण करून काही वर्षे मुंबईला आय.टी. कंपनीमध्ये काम केल्यानंतर चेन्नईमध्ये त्यांनी पुढील वाटचाल केली. येथूनच 2014 साली अमेरिकेत जाण्याचा योग आला आणि त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. 2017 साली त्यांनी अमेरिकेमध्ये स्वत:चे स्टार्टअप सुरू केले. मात्र पगार, संपत्ती कितीही कमावली तरी स्वदेश त्यांना बोलवित होता. बुध्दीमत्ता कितीही असली तरी बाह्य सादरीकरणावर एखाद्याला पारखले जाते. संगमनेरसारख्या ग्रामिण भागातील मुलांना शिक्षण, शिष्टाचार आणि नोकरी याचा सुरेख संगम मिळवून देण्यासाठी घुगे यांनी पारेगाव खुर्द येथे 500 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली आहे. अभ्यासक्रम हा केवळ माहितीपर न ठेवता प्रत्येक विद्यार्थ्याला प्रात्यक्षिकाद्वारे प्रोग्रामिंग शिकवले जाणार आहे. बॅचलर इन कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम विद्यार्थ्याने पूर्ण केल्यानंतर त्याला नुसती डिग्री प्राप्त होणार नसून तेथेच चांगल्या पगाराची नोकरी सुध्दा लागणार आहे. पुणे-मुंबई-बेंगलोर येथे नोकरीसाठी भटकण्यापेक्षा पारेगावमध्येच राहून आय.टी. क्षेत्रातील नोकरी करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी कर्ता माणूस नाही त्या विद्यार्थ्याला संगमनेरमध्येच राहून आपले घरसुध्दा सांभाळता येणार आहे.


वाचण्यासाठी हे जेवढे चांगले वाटतेय तेवढेच प्रत्यक्षात आणण्यासाठी अवघड होते. पारेगाव म्हणजे दुष्काळी गाव. येथे पाण्याचा प्रश्‍न बिकट आहे. वीज असून नसल्यासारखी. नेटवर्कचा प्रॉब्लेम त्याहूनही वाईट. अशा परिस्थितीत अतिशय सुंदर इमारत रावसाहेब घुगे यांनी उभारली आहे. नेटवर्कसाठी मोबाईल नेटवर्किंग कंपन्यांचे टॉवर्स उभारले आहेत. पाण्याची विशेष व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना वीजेची अडचण नको म्हणून जनरेटर्स उपलब्ध आहेत. बाहेरगावहून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज होस्टेलची निर्मिती झाली आहे. होस्टेलच्या शेजारीच मेस आणि कँटिनदेखील बनत आहे. यातून स्थानिकांना रोजगार निर्माण झाला आहे. केवळ आय.टी. कंपनीपुरता विचार न करता ही भविष्यात ही जागा कृषी पर्यटनासाठी सुध्दा वापरली गेली पाहिजे हा विचार घुगे यांचा आहे. द बाप कंपनीच्या उभारणीात रावसाहेबांच्या अनेक मित्रांची, कंपन्यांची मदत झाली आहे. उद्घाटन होण्याआधीच अनेक विद्यार्थी कंपनीसाठी काम करत आहेत. रावसाहेब घुगे यांचे हे कार्य अवघ्या संगमनेरकरांसाठी अभिमानास्पद आहे. रावसाहेबांच्या पाठीशी कपंनीचे उपाध्यक्ष आय.टी. तज्ज्ञ दिपक नागरे व रावसाहेबांचे वडिल रामनाथ घुगे (बाप) खंबीरपणे उभे आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामिण भागात सुरू झालेली ही नवी चळवळ आहे. या मातीतून असेच रावसाहेब घुगे जन्माला येवोत आणि रंजल्या-गांजल्यांचे ते उध्दार करोत हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना.

Sudeep Hase
Sudeep Hase
  • सुदीप हासे,
    कार्यकारी संपादक, दै. युवावार्ता, संगमनेर
    मो. 7720046005

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here