अभियंत्याचे दैवत भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या

​भारतरत्न डॉ मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1860 साली म्हैसुर राज्यात (आताचे कर्नाटक राज्य) कोलार जिल्हयातील चिकबल्लापूर तालुक्यातील मुदेनहल्लीगावात झाला त्यांचे वडील श्रीनिवास शास्त्री हे संस्कृतचे पंडित व आयुर्वेद तज्ञ होते. त्यांच्या आईचे नांव व्यंकम्मा. सर विश्र्वेश्र्वरय्या 15 वर्षाचे असतांना त्याचे वडील वारले. विश्र्वेश्र्वरय्या यांनी प्राथमिक शिक्षण चिकबल्लापूर येथे पुर्ण केले. यानंतर त्यांनी बंगळुर येथील सेंट्रल महाविद्यालया मध्ये पदवी शिक्षण पुर्ण केले. मद्रास विद्यापीठातुन 1881 साली बी.ए. पास केल्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेत, कॉलेज ऑफ सायन्स आताचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) येथुन 1883 साली प्रथम श्रेणीत एलसीई आणि एफसीई परीक्षा उतीर्ण केल्या. या परीक्ष आत्ताच्या बी.ई. परीक्षेच्या समकक्ष आहे.
​सर मोक्षगुंडम विश्र्वेश्र्वरय्या यांचे स्थापत्य अभियांत्रिकीतील शिक्षण पुर्ण होताच ब्रिटीश सरकारच्या मुंबई इलाख्यात सहाय्यक अभियंता या पदावर रुजु करुन घेतले. त्यांची पहिली नेमणुक नाशिक धुळे परीसरात झाली. स्थापत्य अभियांत्रिकीतील अनेक प्रकल्प त्यांनी यशस्वीरित्या पुर्णत्वास नेले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्हात त्यांनी काम केले. 1904 साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.
​खडकवासला येथील धरणात संशोधन करुन स्वयंचलित शीर्षव्दारे बसविण्यात आली. 1906 साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची सहाय्यक बंदर अधिकारी म्हणुन नेमणुक झाली. त्यापुर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणुन काम केले. 1908 साली सर विश्र्वेश्र्वरय्या सरकारी नोकरीतुन निवृत्त झाले.
​म्हैसुर राज्याचे महाराज श्री कृष्णराजेंद्र वाडियार यांच्या विनंतीनुसार सर विश्र्वेश्र्वरय्या यांनी म्हैसुर राज्यासाठी काम करण्याची तयारी दाखवली व ते म्हैसुर राज्याचे मुख्य अभियंता पदावर रुजु झाले. त्यांनी म्हैसुर राज्यात सर्वांसाठी अनिवार्य शिक्षण लागु केले.
​1912 साली ते म्हैसुर राज्याचे दिवाण झाले तिथे त्यांनी कर्मचाऱ्यांना कार्यक्षेमतेने काम करण्याचे व प्रशासकिय कामात सुधारणा करण्याचे आवाहन केले. उशिरा व अनियमितपणे कामावर येण्यावर कठोर पध्दतींचा वापर करुन त्यांनी पायबंद घातला. कार्यालयातील फाईल्स वेगाने हालण्यावर त्यांचा विशेष जोर होता. फाईलींचा निपटारा कसा करावा या बद्दल त्यांनी कार्यपध्दती आखुन दिली. प्राधान्यतेप्रमाणे फाईल्सची विभागणी करणे, फाईल्समधल्या कागदपत्रांची रचना त्यांच्या महत्वाप्रमाणे करणे, महत्वाच्या कागदांना फ्लॅग लावणे या नवीन पध्दतींची त्यांनी आपल्या कार्यालयात सुरुवात केली. अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे व त्यांचे कामाचे मुल्याकंन करणे या पध्दती त्यांनी अमलात आणल्या.
​कर्मचाऱ्याच्या भरतीबद्दलचे संस्थानचे नियम संदिग्ध होते. त्यामुळे भरतीमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार व वशिलेबाजीला वाव होता. सर विश्र्वेश्र्वरय्या यांनी भरती नियमांमध्ये सुधारणा केल्या. त्यामुळे भरतीमधील अनियमितता संपुष्टात आली. न्यायदानाचे व अंमलबजावणी करण्याच्या अधिकारांचे त्यांनी विलगीकरण केले. संस्थानमधील सर्व भागात कामकाज योग्य पध्दतीने चालते किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यांनी दौरे करण्यास सुरुवात केली. या दौऱ्यामध्ये त्यांनी कार्यालयातील पत्रव्यवहारांचे योग्य पध्दतीने जतन होते की नाही, कार्यालय व कार्यालयीन परीसराची स्वच्छता, प्रत्येक कामाची प्रगती इ. याचा ते बारकाईने अभ्यास करीत.

​1912 ते 1918 ही सहा वर्षे म्हैसुर संस्थानचे दिवाण म्हणुन शिक्षण, उद्योग, कृषी आदी सर्व क्षेत्रांत नेत्रादीपक कामगिरी केली. म्हैसुर आर्थिक परिषदेला स्थायी स्वरुप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. म्हैसुर बँक, म्हैसुर विद्यापीठ, मुलींचे पहिले वसतीगृह व शेतकी महाविद्यालय, वृदावन गार्डन, कन्नड साहीत्य अकादमी, रेशीम उत्पादन , चंदन तेल, म्हैसुर सँडल साबण, धातु व क्रोम टॅनिंग, सिमेंट कारखाने, साखर कारखाने, लघु उद्योग, हॉटेल च उपहारगृहे, विश्रामधाम, मुद्राणालये, क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली.
​म्हैसुरसाठी भाटकलला बंदराची सोय केली. सेवाभरती शर्ती मागासवर्गीयांसाठी राखीव जागा आदी समाजोन्मुख कार्य त्यांनी केले. मुंबईची प्रिमियर ऑटोमोबाईल इंडस्ट्री स्थापण्यातही त्यांनी विशेष प्रयत्न केले. सिंध विभाग (सध्या पाकीस्तान) येथील पाणी पुरवठा हा एक डोकेदुखीचा प्रश्न झाला होता. अनेक ब्रिटीश अभियत्यांना तो सोडविता आला नाही. तिथे येणारे पाणी हे कायमस्वरुपी गढुळ असायचे. फिल्टरेशन प्लॅन्ट बसविणे शक्य होते पण ते तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेला परवडणारे नव्हते. सर विश्र्वेश्र्वरय्या यांची तेथे तज्ञ म्हणुन नेमणुक झाली. त्याकाळात सिंध हा मुंबई राज्याचाच एक भाग होता. पाण्यातील गाळ बाजुला करण्यासाठी पाणी गाळले जाणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी नदीपात्रातच एक विहीर घेतली. नदीपात्रात असलेल्या वाळुचा वापर करुन पाणी आपोआप गाळुन विहीरीत आणण्याची योजना होती. त्यानंतर हे पाणी कलेक्शन वेल मध्ये जमा करुन शहरात वितरणसाठी पाठविणे शक्य होणार होते. त्या गाळुन पाणी जमा करण्याऱ्या विहीरीला त्यांनी ‘पर्कोलेशन वेल’ असे नांव दिले. आज देखील ही पध्दत रुढ पध्दत असल्यासारखी वापरली जाते. त्या पर्कोलेशन विहीरीला ‘जॅकवेल’ असे नांव रुढ झाले आहे. ब्रिटीश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहबाद व म्हैसुर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी.लिट देऊन गौरवले. 1955 साली भारत सरकाने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ देऊन गौरवले. त्यांच्या स्मरनाप्रीत्यर्थ पोष्टाचे तिकीट काढले. देशातील अनेक संस्थाना विश्र्वेश्र्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. कर्नाटक सरकाने बंगलोर येथे “सर विश्र्वेश्र्वरय्या सायन्स म्युझियम” उभारले आहे. हे म्युझियम भारतातले सर्वात मोठे सायन्य म्युझियम आहे.
​त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणुन भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत 1998 पासुन त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणुन भारतरत्न सर विश्र्वेश्र्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र्र शासनाने ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे.
​सर विश्र्वेश्र्वरय्या यांच्या जन्मगावी असलेल्या घराचे 1971 मध्ये राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. या घरातली वास्तुसंग्रहालयात विश्र्वेश्र्वरय्या यांच्या वापरातील वस्तु त्यांना मिळालेल्या भेटवस्तु व भरतरत्न गौरव पदक ठेवण्यात आले आहे.
​​​​​​-

  • इंजि. हरिभाऊ गिते
    अध्यक्ष सरळसेवा वर्ग १ अभियात्रिकी अधिकारी संघटना महाराष्ट्र राज्य
  • इंजि. संदीप पांडागळे
    ​​​​​​सहाय्यक अभियंता श्रेणी-1, ​​​​​सार्वजनिक बांधकाम विभाग

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख