नोकरीच्या अमिषाने संगमनेरातील चौघांची 22 लाखांची फसवणूक

0
1946

पुणेतील तिघा जणांवर गुन्हा दाखल

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर –
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पुणे व मुंबई येथील तिघा जणांनी तालुक्यातील चार जणांची २२ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेर येथे खाजगी नोकरी करणाऱ्या प्राची रमेश काकड हिला तिची कॉलेजची मैत्रीण किर्ती सतिषकुमार भालेराव हिचा फोन आला. मला पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे क्लर्क म्हणून कायमस्वरुपी नोकरी लागली असून मला ४५ हजार रुपये पगार आहे. जॉब कसा लागला असे विचारले असता आपल्या मामाचे मित्र शिवदर्शन नेताजी चव्हाण यांची पिपरी चिंचवड महानगर पालिकेत ओळख असून मी त्यांना ५ लाख रुपये देऊन सदरचा जॉब मिळविला आहे. तुला देखील पैसे भरून जॉब मिळेल असे सांगितले. तू अडीच लाख आता तू दे व जॉब लेटर हातात भेटल्यानंतर अडीच लाख रुपये दे, असे सांगून विश्वास संपादन केला.

. त्यावेळी मी तिचेवर विश्वास ठेवून दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी पेटीएम नंबरवरुन किर्ती भालेराव हीचा मोबाईल नंबरवर १ लाख रुपये पाठविले. त्यानंतर किर्ती हीने पुणे येथे शैक्षणिक कागदपत्र घेऊन शिवदर्शन नेताजी चव्हाण यांना भेटण्यास सांगितले. शिवदर्शन नेताजी चव्हाण व विश्वजित विकास चव्हाण हे भेटले. त्यावेळी शिवदर्शन चव्हाण यांनी सांगितले की, माझे वडील हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे महानगरपालिकेत माझी चांगली ओळख असून तुमचे काम मी करून देतो. आम्हीच किर्ती भालेराव हिला नोकरीस लावले आहे असे सांगून आमची विश्वजीत विकास चव्हाण यांचे सोबत ओळख करून दिली. सोबत आलेले ज्योती सातपुते हिने तिला स्वतःला तसेच प्रतिक पवार यांनी त्यांचे पत्नी शिवाणी प्रतिक हीस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत क्लर्क या पदावर नोकरी मिळेल का? असे विचारल्यावर शिवदर्शन चव्हाण व विश्वजित विकास चव्हाण यांनी आम्हाला विश्वासात घेऊन तुम्हाला देखील जॉब मिळवून देतो असे सांगितले. त्यावेळी आम्ही पुन्हा किर्ती भालेराव हीस विचारले असता तिने मला सांगितले की, तुम्ही विश्वास ठेवून पैसे भरा तुमचे काम नक्की होईल. किर्ती सतिषकुमार भालेराव, शिवदर्शन बेताजी चव्हाण व विश्वजित विकास चव्हाण यांचेवर विश्वास ठेवुन मी टप्प्याटप्प्याने किर्ती भालेराव हीचे मोबाईल क्रमांक ८९२८६४४५८४ यावर व विश्वजित चव्हाण मोबाईल क्रमांक ७७७५००९८६८ यावर माझे वर्ग मित्र गोविंदा मुंदडा व वडील रमेश काकड, व माझे मोबाईल क्रमांकावरून सुरुवातीला अडीच लाख रुपये पाठविले.

त्यानंतर मी किर्ती हीस जॉइनिंग लेटर मागितले असता तिने मला पूर्ण पैसे भरल्याशिवाय जॉईनींग लेटर देता येणार नाही असे सांगितल्याने मी राहिलेले लाख व वरील ४० हजार रुपये टप्प्या टप्प्याने पाठवून दिले. त्याच दरम्यान माझी मैत्रिण ज्योती सातपुते हीने तसेच ऑनलाईन स्वरुपात ५ लाख ४० हजार रुपये ही किर्ती भालेराव व विश्वजित चव्हाण यांचे खात्यावर ट्रान्सफर केले. शिवानी प्रतिक पवार यांनी देखील ५ लाख ४० हजार रुपये विश्वजित चव्हाण यांचे खात्यावर ट्रान्सफर केले. आम्ही पैसे भरल्याचे आमची मैत्रीण प्रतिमा सुनील हांडे हीला समजल्यानंतर तिने देखील पती सुनिल यशवंत हांडे यांना नोकरीसाठी पैसे भरण्याची तयारी दाखविली व तीचे पती सुनील यशवंत हांडे टप्प्या टप्प्याने एकूण ५ लाख ९० हजार रुपये ऑनलाईन स्वरुपात विश्वजित चव्हाण याचे खात्यावर टाकले. नोकरी लावून देण्यासाठी त्यांनी प्राची रमेश काकड हिच्याकडून ५ लाख ४० हजार, ज्योती संजय सातपुते (मालदाड रोड, संगमनेर) यांचे ५ लाख ४० हजार, शिवानी प्रतिक पवार (रा. मंगळापुर, ता. संगमनेर) ५ लाख ४० हजार, सुनिल यशवंत हांडे (रा. इंदिरा नगर, संगमनेर) ९० हजार रुपये असे एकूण २२ लाख १० हजार रुपये घेतले. पिंपरी चिंचवड पालिकेत नोकरी लावुन न देता संबंधित युवकांच्या व्हॉटस अॅपवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा लोगो व आयुक्तांचा शिक्का असलेले खोटे नियुक्ती पत्र पाठविले. नोकरी न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मागितले मात्र या भामट्याने पैसे परत दिले नाही. याबाबत प्राची रमेश काकड हिने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी किर्ती सतिषकुमार भालेराव (कामराजनगर, घाटकोपर, मुंबई), शिवदर्शन नेताजी चव्हाण, विश्वजीत विकास चव्हाण • (राहणार चिंचवड, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here