घारगाव (प्रतिनिधी)
आजीबाई या परिसरात खुप चोरटे सुटले आहेत. पायी जाणार्या महिलांना अडवून त्यांना मारहाण क रण्यात येत असून त्यांचे दागिनेही काढून घेतले जात आहे. त्यामुळे आजी तुम्ही तुमचे दागिने क ाढून पुडीत बांधून ठेवा, आम्ही पोलीस तुम्हाला मदत करतो. असे सांगणार्या भामट्यांवर विश्वास ठेवून या आजीबाईने आपल्या गळ्यातील दिड तोळ्याचे दागिने या भामट्यांकडून पुडीत बांधून घेतले. घरी येऊन इतर महिलांना जागृत करण्यासाठी हि बातमी ओरडून सांगणार्या या आजीबाईने हि पुडी उघडून पाहिली असता त्यात सोने नाही तर चक्क वाळू आढळून आली. आणि या आजीबाईने एकच हंबरडा फोडला. हि संतापजनक घटना काल सोमवारी दुपारी 2.30 च्या सुमारास संगमनेर तालुक्यातील आंबा खालसा फाट्यावर घडली.
या बाबत माहिती अशी की, तालुक्यातील पठार भागातील आंबी खालसा येथे राहणार्या ताराबाई किसन पांडे या 65 वर्षीय महिला घारगाव येथून आंबी खालसा या आपल्या गावी पायी जात होत्या. दरम्यान आंबी खालसा फाट्याजवळ दोन अज्ञात इसम मोटारसायकलवरुन त्यांच्याजवळ आले. एकट्या आजीबाईला पाहुन ते म्हणाले या परिसरात मोठ्या प्रमाणावर चोर्या होत आहेत. नुकत्याच चोरांनी एका बाईला मारुन टाकत तिचे दागीणे तिचे दागीणे काढून नेले आहेत. आम्ही पोलीस असून महिलांना सावध करीत आहेत. आजीबाई तुम्ही तुमचे दागीणे काढून पुडीत बांधून ठेवा आम्ही तुम्हाला मदत करतो. आज्जींनीही त्यांच्या या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवत आपल्या गळ्यातील रामपान व डोरले असे दिड तोळ्याचे दागीणे पुडीत बांधण्यासाठी त्यांच्याकडे दिले. या भामट्यांनी हातचालाकी करत दुसरी पुडी या महिलेच्या हातात दिली व तिच्याच हाताने हि पुडी पिशवीत ठेवली. आता तुम्ही निवांत घरी जा असे म्हणत त्यांनी तेथून धूम ठोकली.
ही घटना घडल्यानंतर ताराबाई पांडे या आपल्या घरी गेल्या व ही बातमी इतर महिलांना जागृक करण्यासाठी सांगत तुम्ही दागीणे काढुन ठेवा गावात चोर सुटले आहे. आत्ताच मला पोलीसांनी मदत केली आणि माझे दागीणे वाचले असे म्हणत या महिलेने पिशवीत ठेवलेली पुडी इतर महिलांना दाखवली. ही पुडी या महिलांसमोर उघडी केली असता त्यात सोन्याऐवजी चक्क वाळू निघाली. हे पाहताच या वृध्द महिलेने एकच हंबरडा फोडला. आपण फसले गेलो आहोत, लुटले गेलो आहोत याची जाणीव त्यांना झाली. या बाबतची माहिती घारगाव पोलीस ठाण्याचे पो.नि. सुनील पाटील यांना समजताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राजेंद्र लांघे, राजेंद्र फड यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली. याबाबत सदर महिलेच्या फिर्यादीवरुन दोन अज्ञात इसमांवर चोरीचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
ग्रामिण भागातील महिला, वृध्द महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेत सदर भामटे पोलीस असल्याचे भासवून महिलांना फसवत आहेत. अशा फसवणुकीच्या अनेक घटना यापूर्वीही तालुक्याच्या विविध भागात घडलेल्या आहेत. त्यातच पठार भागात असा प्रकार अनेकवेळा घडलेला आढळून येतो. या भागातील चोरटे चोरी करुन पुणे जिल्ह्यात पसार होतात. त्यामुळे अशा चोर्यांचा शोध लावण्यात पोलीसांना मोठी अडचण येते. मात्र महिलांनी अशा पध्दतीने विश्वास ठेवून आपल्या किमती वस्तू कुणाच्या ताब्यात देऊ नये असे आवाहन पोलीसांनी केले