संगमनेरातील मनोज जरांगे पाटलांच्या विराट सभेची तयारी पूर्ण

0
1542

ऐतिहासिक सभा करण्याचा सकल मराठा समाजाचा निर्धार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – मराठा आरक्षणासाठी प्राणपणाने लढणारे मनोज जरांगे पाटील यांची बुधवार दि. 22 नोव्हेंबर रोजी संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर विराट सभा होत आहे. या विराट सभेसाठी लागणारे स्टेजसह इतर सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तालुक्याच्या चारही बाजूने येणार्‍या मराठा समाज बांधवांच्या वाहन पार्किंगची ही व्यवस्था करण्यात आली आहे.
‘एकच ध्यास मराठा आरक्षण’ मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या एकमुखी मागणीसाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. मराठा समाजात जन जागृती व्हावी यासाठी त्यांनी आपल्या दुसर्‍या टप्प्यातील संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. शिवस्मृति दिनानिमित्ताने पट्टाकिल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून जरांगे पाटील हे बुधवारी दुपारी 3 वा संगमनेरात दाखल होणार आहे. यावेळी त्यांच्या जंगी स्वागताची तयारी संगमनेर शहर आणि तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्ण झाली आहे. या स्वागतानंतर जाणता राजा मैदानावर जाहीर विराट सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील हे मार्गदर्शन करणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत विविध मान्यवर उपस्थित राहाणार आहे. सुमारे 40 ते 50 हजार क्षमतेच्या या मैदानावर सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. तसेट संपूर्ण मैदान सपाटीकरण करण्यात आले आहे. आजूबाजुचे अतिक्रमण हटविण्यात आले असून भव्य स्टेज, बॅरिकेटस्, भव्य गेट उभारण्यात आले आहे. काल सोमवारी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, तहसीलदार धीरज मांजरे यांनी या मैदानावर जाऊन सर्व सुरक्षा व उपाय योजनांची पाहणी केली व आवश्यक त्या सुचना सयोजकांना केल्या. बुधवारी होणार्‍या येथील विराट सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून 3 पोलीस उपअधिक्षक, 7 पोलीस निरीक्षक, 23 पोलीस उपनिरीक्षक, 125 पोलीस कर्मचारी, 40 महिला कर्मचारी, होमगार्ड त्याचबरोबर स्वयंसेवक असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.


या सभेसाठी शहरासह तालुका व तालुक्याबाहेरून हजारोंच्या संख्येने समाज बांधव येणार असल्याने त्यांच्या वाहन पार्किंगची सर्व व्यवस्था शहरातील विविध भागात करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्याच्या पश्‍चिम भागाकडून येणार्‍या मराठा समाज बांधवांच्या पार्किंगची व्यवस्था मेडिकेव्हर हॉस्पिटलच्या पश्‍चिमेस नवले यांचा प्लॉट, श्रमिक मंगल कार्यालय, शारदा विद्यालय अकोले नाका व इंदिरा नगरमधील प्रांत कार्यालयांच्या निवासस्थाना समोरील प्रांगणात केली आहे. पूर्वभागाकडून येणार्‍या समाज बांधवांसाठी ज्ञानमाता विद्यालय, पावबाकी रोड सातपुते नगर, पोतदार शाळेजवळ, आशिष गार्डन तसेच उत्तर भागातून येणार्‍या समाज बांधवांसाठी मार्केट यार्ड पटांगण, शेतकी संघ पटांगण, मालपाणी लॉन्स पटांगण, राजेंद्र होंडाचे पाठीमाग महावितरणचे पटांगण, दक्षिण भागातून येणार्‍या समाज बांधवांसाठी संगमनेर खुर्द येथील शोएब पठाण यांच्य प्रवरा सर्विस स्टेशनजवळ मोकळा प्लॉट आणि ज्ञानमाता विद्यालय आशा 4 ही बाजूने येणार्‍या मराठा समाज बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व बांधवांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच आपली वाहने पार्किंग करावी असे ही आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील लढा देत आहे. त्यांच्या या लढ्याला साथ देण्यासाठी संगमनेरातील सकल मराठा समाज एकजुटपणे त्यांच्यासोबत उभा आहे. ही एकजुट दाखविण्यासाठी बुधवारची होणारी सभा विराट व ऐतिहासीक करण्यासाठी या सभेचे संयोजक गेली अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहे. या विराट सभेकडे संपूर्ण संगमनेरकरांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here