वडगावपानमध्ये घडला प्रकार
तीन पोलीस जखमी
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- ज्यांच्या खांद्यावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे ते पोलीस बाप लेक यांच्यात झालेल्या मारामार्या सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावर याच बाप लेकांनी भाजी कापण्याच्या सुरीने हल्ला केला. तसेच काठीने मारहाण करुन धक्काबुक्की करण्यात आली. यात पोलीस हेडकॉनस्टेबल बन्सी येसू टोपले, ओंकार शेंगाळ आणि राजेंद्र घोलप असे तीन पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवारी सकाळी तालुक्यातील वडगावपान येथे घडली.
याप्रकरणी तेजस दत्तू काशिद व दत्तू काशिनाथ काशिद (दोघे रा. वडगाव पान, ता. संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शनिवार दि. 9 डिसेंबर 2023 रोजी पहाटे दत्तू काशिद याने आपल्या मुलीस मारहाण केली. तेव्हा त्यांचा मुलगा तेजस काशिद याने बहिनीला मारहाण कशाला केली या कारणाहून बाप- लेकांमध्ये वाद झाले. दोघांचे वाद टोकाला गेल्यामुळे तेजस याने तेथेच असणारी एक मोटार उचलून ती बापाच्या डोक्यात टाकली. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला गेला. दोघांनाही गावकर्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिटला नाही. दोघे एकमेकांना भिडले आणि त्यांच्यात मारामार्या सुरू झाल्या म्हणून, या घटनेतून एखादा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून काही व्यक्तींनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती दिली.
दरम्यान पोलीस कर्मचारी बन्सी टोपले, ओंकार शेंगाळ आणि राजेंद्र घोलप यांनी तत्काळ वडगावपान गाठले. पोलिसांनी या दोघांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेव्हा पोलिसांनी दोघांना पोलीस गाडीत टाकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेजस याने गाडीत बसण्यास विरोध करुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी धिटाई केली असता बापलेक एकत्र आले. हे आमच्या घरातील भांडणे आहेत आम्ही ती मिटवून घेऊ, तुम्ही येथून चालते व्हा. असे सांगितले.
यावेळी आरोपी तेजस याने त्याच्या हातातील सुरी पोलीस ओंकार शेंगाळ यांच्या डोक्यात मारली. तर राजेंद्र घोलप यांच्या उजव्या हातावर मारली. तसेच दत्तू याने देखील काठीने पोलिसांना मारत धक्काबुक्की केली. याप्रकरणी दत्तू काशिद यास अटक केली असून बाप लेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.