कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांचा दीड तास रास्तारोको

0
1940

शेतकर्‍यांच्या आक्रमकपणापुढे व्यापार्‍यांची माघार

युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर- कांद्याचे भाव अचानक कोसळल्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी नाशिक पुणे महामार्ग आडवत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुमारे दीड तास रास्तारोको आंदोलन केले. बाजार समितीच्या सभापतींनी फेर लिलाव करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. मात्र सभापतींनी सांगून सुद्धा व्यापारी फेर लिलाव करत नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी पुन्हा सभापतीच्या दालनाच्या बाहेर येत फेर लिलाव न करणार्‍या व्यापार्‍यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर सभापती व सचिव यांनी कांदा लिलावाच्या ठिकाणी जाऊन व्यापार्‍यांना लगेच फेरलिलाव चालू करण्याचे सक्त आदेश दिले. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आक्रमकपणापुढे व्यापार्‍यांनी माघारी घेत सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फेर लिलाव सुरू केले.


संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याला चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. मात्र शुक्रवारी अचानक हा भाव निम्म्याने घसरत दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल मिळू लागला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी बाजार समितीमध्ये सुरू असणारे कांद्याचे लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रवेशद्वाराच्या समोर पुणे नाशिक महामार्ग आडवत केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. शेतकरी एकजुटीचा विजय असो, कांद्याला हमी भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत रस्तारोको आंदोलन सुरू केले.
या आंदोलनामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली. शहर पो. नि. भगवान मथुरे व पो. नि. देविदास ढुमणे यांनी आपल्या सहकार्‍यांसह आंदोलन स्थळी धाव घेतली आणि शेतक र्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या तयारीत नव्हते. कांद्याचे भाव पाडणार्‍या व्यापार्‍यांना येथे बोलवा आणि कांद्याचे भाव अचानक का कमी केले याचे उत्तर दिल्या शिवाय आम्ही येथून हटणार नाही असा पवित्रा संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी घेतला.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर व सचिव सतीश गुंजाळ यांनी कांदा व्यापार्‍यांना याचा जाब विचारला असता रात्री अचानक केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केली असल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. त्यावर संतप्त शेतकर्‍यांनी तुम्ही आम्हाला अगोदर कळवले का नाही आम्ही कशाला कांदा आणला असता असा सवाल करत कांद्याचे पुन्हा फेर लिलाव करावा आणि कालच्या प्रमाणे भाव द्यावा अशी मागणी लावून धरली. त्यानंतर बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर यांनी कांदा उत्पादक शेतकर्‍यांची समजूत काढत कांद्याचे पुन्हा फेर लिलाव केले जातील असे आश्वासन दिल्यानंतर शेतकर्‍यांनी दीड वाजता सुरू झालेला रस्ता रोको आंदोलन तीन वाजता मागे घेतले.
सभापतींनी दिलेल्या आश्वासनावर कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा मार्केटमध्ये लिलावाच्या ठिकाणी आले असता अर्धा एकतास उलटून गेला तरी व्यापारी फेर लिलाव सुरू करत नव्हते. त्यामुळे शेतकरी पुन्हा आक्रमक झाले. आणि त्यांनी थेट सभापतींच्या दालनाच्या बाहेर व्यापार्‍यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सभापती शंकर खेमनर, थोरात साखर कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहळ, सचिव सतीश गुंजाळ यांनी कांदा उत्पादक शेतकर्‍यां बरोबर कांदा लिलावाच्या ठिकाणी जात तात्काळ शेतकर्‍यांच्या कांद्याचे फेर लिलाव सुरू करा असे सक्त आदेश दिले. त्यानंतर अखेर शेतकर्‍यां पुढे गुडघे टेकत व्यापार्‍यांनी पुन्हा कांद्याचे फिरलेला सुरू केले. 900 रुपयांपासून तीन ते साडेतीन हजार रुपयापर्यंत कांदाला भाव काढण्यात आला. त्यानंतर शेतकर्‍यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here