परिसरातील नागरिकांसह, ढोलेवाडी, राजापूर व त्यापुढील गावातील विद्यार्थ्यांना, नोकरदार नागरीकांना त्रास
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – संगमनेर शहरातून म्हाळुंगी नदीवरील राजापूरकडे जाणार्या सिमेंट काँक्रिट रस्ताचे प्रदिर्घ कालावधीनंतर अखेर काम पूर्ण झाले. हे काम पूर्ण होऊन 15 ते 20 दिवस झाले असून देखील हा रस्ता वाहतूकीसाठी खुला होत नसल्याने परिसरातील नागरिकांसह, ढोलेवाडी, राजापूर व त्यापुढील गावातील विद्यार्थ्यांना, नोकरदार नागरीकांना त्रास होत आहे.
त्यामुळे हा रस्ता तात्काळ वाहतूकीसाठी खुला करावा अशी मागणी केली जात आहे.
गु़ंजाळवाडी, राजापूर मार्गे शहरात येणार्या मुलांना, नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी आल्यानंतर हा रस्ता अजूनही बंद असल्याचे दिसते. त्यामुळे मेडिकव्हर हॉस्पिटल जवळून फिरून पुन्हा माघारी जावे लागत आहे. अकोले रोडने आलेल्या नागरीकांना मेडिकव्हर हॉस्पिटल किंवा नाशिक रोडच्या दिशेने जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. परंतू गेल्या अनेक दिवसांपासून हा मार्ग बंद असल्याने मोठा वळसा घालून जावे लागते. वारंवार हा त्रास होत असल्याने नागरिक, प्रवासी त्रासले आहे. सदर रस्ता हा ढोलेवाडी, राजापूरला जोडले गेलेल्या पुलाचा आहे. त्यामुळे येथून वाहतूक जास्त असते. हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.