सुशोभित दिसण्याऐवजी दिसतात विद्रुप
युवावार्ता (प्रतिनिधी)
संगमनेर – नगरपालिकेच्या वतीने शहरातील अनेक चौकांमध्ये वेगवेगळ्या आकाराचे सुंदर असे सर्कल बनविण्यात आले होते. त्यासाठी लाखो रुपये जनतेच्या कराचे पैसे खर्च करण्यात आले मात्र या सर्कलची देखभाल, दुरुस्ती, सुशोभिकरण करण्यात न आल्याने व केल्यानंतर लक्ष न दिल्याने आज या यातील अनेक सर्कलची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी तर नागरीकांनी याची कचराकुंडीच केली आहे. परंतु त्याकडे पालिका प्रशासन व कर्मचार्यांचे दुर्लक्ष आहे. संगमनेर शहराचा विस्तार व विकास झपाट्याने होत असताना शहरांतर्गत रस्त्याचे जाळे विणले जात आहे. ज्या ठिकाणी तीन किंवा चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी पालिकेच्या वतीने मोठमोठे सर्कल बांधण्यात आले आहे. यात पेटिट कॉलेज सर्कल, मालदाड रोड वरील सर्कल, मच्छी सर्कल (नवीन नगर रोड) यासह अनेक छोटे मोठे सर्कल तयार करण्यात आले.
त्यात वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाडे लावण्यात आली. मात्र याकडे पालिका कर्मचार्यांनी लक्ष न दिल्याने आज याच सर्कलची अनेक ठिकाणी दुरावस्था झालेली पहायला मिळत आहे.
शहरातील मालदाड रोड या ठिकाणच्या सर्कल जवळ भाजी बाजार भरतो त्यामुळे आधीच त्याठिकाणी हा सर्कल निरुपयोगी ठरला असून रात्री भाजी विक्रेते व पहाटे आजूबाजूचे नागरिक याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचरा टाकतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना व येथून ये जा करणार्या प्रवाशांना तोंडाला रुमाल बांधून जाण्याची वेळ येते. पालिकेच्या ठेकेदारांकडून येथील भाजीविक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर कर गोळा केला जातो परंतु त्यांना सुविधा नावाची कोणतीही गोष्ट उपलब्ध करून दिली जात नाही. दुसरीकडे पालिकेने बांधलेल्या या आकर्षक सर्कलमध्ये रंगबिरंगी फुलझाडे उगवण्याऐवजी काटेरी झाडे झुडपे, गवत उगवत आहे. अनेक ठिकाणी या सर्कलची उंची प्रमाणापेक्षा जास्त व त्यात झाडे झुडपे व गवत वाढल्याने दुसर्या बाजूने येणारी वाहने नीट दिसत नाही त्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.