नाशिक पदवीधर मतदारसंघ : मुलासाठी वडीलांची माघार ; डॉ. तांबेंना काँग्रेसकडून उमेदवारी मिळूनही अर्ज भरला नाही

सत्यजित तांबेंचा अपक्ष अर्ज दाखल
सत्यजित तांबेच्या अर्जाने सस्पेन्स कायम

दैनिक युवावार्ता
संगमनेर (प्रतिनिधी)
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तशी दुर्लक्षित निवडणूक असते, परंतु आ. डॉ. सुधीर तांबे व त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांच्या पैकी कोण आणि कुठल्या पक्षाकडून अर्ज भरणार याची उत्सुकता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिल्याने या निवडणुकीच्या सस्पेन्समुळे जिल्ह्यासह राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते. मात्र ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होऊनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर सत्यजित तांबे यांनी एक काँग्रेसकडून व एक अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले आहे. तर भाजपकडून नगरचे धनंजय जाधव यांनी उमेदवारी दिली आहे.परंतु त्यांना पक्षाचा ए.बी. फॉर्म नसल्याने टी भाजपची अधिकृत उमेदवारी ठरणार नाही. दरम्यान सत्यजित तांबे यांनी आपण पुर्ण ताकदीने ही निवडणूक लढणार असून सर्व पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. दरम्यान डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसची अधिकृत उमेदवारी डावलल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सत्यजित तांबेंना काँग्रेसने पाठिंबा दिला नाही तर अपेक्षेप्रमाणे सत्यजित तांबे हे भाजपचे उमेदवार राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच सुरुवातीपासून सस्पेंन्स बनलेल्या या निवडणूकीचा अर्ज माघारी पर्यंत हा सस्पेंन्स कायम राहणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना सत्यजित तांबे सोबत डॉ.सुधीर तांबे

सत्यजित तांबे यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही कालावधीत काढलेल्या गौरवोद्गारामुळे व भाजपची दिलेल्या खुल्या ऑफरमुळे नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीचा सस्पेंन्स वाढला होता. डॉ. सुधीर तांबे यांची या मतदार संघावर मजबूत पकड असताना देखील काँग्रेस पक्षाकडून त्यांची उमेदवारी लवकर जाहीर झाली नाही. तसेच भाजपने आपली उमेदवारी शेवटपर्यंत गुप्त ठेवली. त्यामुळे शेवटपर्यंत कोण कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करणार याबाबत पक्ष कार्यकर्त्यांनाही कोणतीच कल्पना नव्हती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा सस्पेन्स कायम राहिला. या निवडणूकीत काहितरी मोठी खेळी होणार याची गेल्या काही दिवसांपासून या मतदार संघात चर्चा होती. आणि आज अखेर घडलेही तसेच.


आज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर येथे त्यांना अभिवादन करुन तांबे पिता पुत्र नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी गेले. अखेरच्या क्षणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या आदेशाने डॉ. तांबे यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे डॉ. सुधीर तांबेच काँग्रेसची उमेदवारी करणार हे ठरले होते. मात्र दोन्ही पिता पुत्र आतमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पुन्हा याठिकाणी राजकीय खलबतं होऊन वेगळ्याच खेळ्या खेळण्यात आल्या. सत्यजित तांबेंसाठी काँग्रेसने ए.बी. फॉर्म द्यावा अशी मागणी शेवटच्या क्षणापर्यंत डॉ. तांबे करत होते. मात्र पक्षाने आपला निर्णय बदलला नाही आणि अखेर डॉ्र सुधीर तांबे यांनी आपली अधिकृत उमेदवारी रद्द केली. मुलासाठी त्यांनी माघार घेतल्यानंतर सत्यजित तांबेंनी काँग्रेसकडून एक व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. तर दुसरीकडे भाजपकडून कोण उमेदवारी करणार याची उत्सुकताही शिगेला पोहचली होती. अखेरच्या क्षणी नगरचे धनंजय जाधव यांना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे सत्यजित तांबे भाजपाची उमेदवारी करणार या चर्चेला थोडा ब्रेक लागला मात्र अर्ज माघारीपर्यंत व काँग्रेस पक्षाने आपली भुमिका व आपला निर्णय न बदलल्यास या मतदार संघात राजकिय भुकंप आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काहि क्षण अगोदरच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास आम्हाला आनंदच होईल आणि शेवटच्या क्षणी वेगळी बातमी मिळेल असे भाकीत वर्तविले होते. त्यांचे हे भाकित अखेर खरे ठरले त्यामुळे पुढील बदललेल्या राजकारणाची हि नांदी ठरते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.


माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात हे आजारी असल्याने मुंबईमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत गेल्या काहि दिवसांपासून नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारीवरुन चाललेला गोंधळ हा त्यांच्या संमतीने होत आहे कि त्यांना डावलून होत आहे याबाबत तालुक्यात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

अपक्ष उमेदवारीचा सिलसिला…
1985 साली बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द अपक्ष उमेदवारी करुन निवडून येत आपल्या आमदारकीची सुरुवात केली होती. तर डॉ. सुधीर तांबे यांनी देखील राजकारणाची सुरुवात अपक्ष म्हणूनच निवडून येऊन केली होती. आता हाच कित्ता त्यांचे सुपूत्र सत्यजित तांबे गिरवित असून अपक्ष म्हणूनच ते आमदार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मी काँग्रेसचाच उमेदवार मात्र पाठिंबा सर्वांचा हवा
मी काहि तांत्रीक अडचणीमुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी काँग्रेसचाच उमेदवारी म्हणून निवडणूक रिंगणात आहे. मात्र विधानपरिषदेच्या माध्यमातून काही विधायक कामे करण्यासाठी सर्व राजकिय पक्षांनी आपल्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. हा पाठिंबा मिळविण्यासाठी आपण लवकरच काँग्रेससह भाजप व इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहोत.
– सत्यजित तांबे, अपक्ष उमेदवार

डॉ. तांबेंकडून पक्ष शिस्तीचा भंग?
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी काॅंग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी दिली. परंतु त्यांनी आपल्या मुलासाठी अचानक माघार घेत उमेदवारीच दाखल केली नाही. सत्यजितके व्हिजन आहे, त्याला संधी मिळायला हवी असे म्हणत त्यांनी मुलाला पाठिंबा दिला. मात्र त्यामुळे काॅंग्रेसची हक्काची जागा मात्र अडचणीत आली. त्यामुळे शिस्तभंग म्हणून आता पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे या मतदारसंघावर डॉ. सुधीर तांबे यांची मजबूत पकड आहे. तसेच सत्यजित तांबे हे देखील एक अभ्यासू नेते असून काॅंग्रेसने त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी खुद्द डॉ. तांबे करत असताना पक्षाने त्यांची मागणी मान्य केली नाही. आणि या हक्काच्या जागेवर पक्षाला पाणी सोडावे लागले. चुकांवर चुका हा काॅंग्रेसचा जणू सिलसिलाच बनला आहे की काय असा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांना पडला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

कनेक्ट रहा

21,724चाहतेआवड दर्शवा
2,506अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

नवीनतम लेख